मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव अशी ख्याती असलेला ‘पार्ले महोत्सव’ (Parle Festival) २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या २३व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार पूनम महाजन या महोत्सवाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.
विलेपार्ले कल्चरल सेंटरकडून ‘पार्ले महोत्सव’ या अनोख्या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना यावेळी वाव मिळतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवाचे स्वरूप हे विविध स्पर्धांचे आयोजन असे असून, एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा या महोत्सवादरम्यान घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून सुमारे ३९२ प्रथम पारितोषिकांसह एकूण २५०० पारितोषिके बहाल करण्यात येतील. दिनांक २३ ते ३० डिसेंबर रोजी चालणारा हा महोत्सव विलेपार्लेमधील वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय व साठ्ये महाविद्यालय तसेच सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल. सातत्याने २३ वर्षे आयोजित होत असलेल्या पार्ले महोत्सवातील ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक भाग घेणार आहेत, तर या महोत्सवास यशस्वी करण्यासाठी सुमारे ८०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.
(हेही वाचा – Bomb Threat: जयपूर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात स्फोट घडवून आणण्याचा जयपूर पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश )
प्रेक्षकांसाठी भव्य स्टेडियम वामन मंगेश दुभाषी मैदान उभारण्यात येणार आहे. यावेळी कबड्डी क्षेत्रातील जाणते कार्यकर्ते कै. शंकर मोडक क्रीडा नगरी, कला विभागातील स्पर्धा होत असलेल्या साठ्ये महाविद्यालयात प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर, तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री चित्रमाऊली कै. सुलोचना दीदी नगर असे नाव या महोत्सावावेळी देण्यात येणार आहे.
दरवर्षी यशस्वीपणे होत असलेल्या या पार्ले महोत्सवाच्या आयोजन समितीच्या कोर कमिटीमध्ये मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश मेहता, अशी मंडळी असून माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता व माजी नगरसेवक अनिष मकवानी व अभिजीत सामंत यांचाही सहभाग आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community