मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन, 1 डिसेंबरपासून 24/7 सुरक्षा देणार

90

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणा-या अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली असून, हे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार परिवहन विभाग योग्य विविध उपक्रम राबवणार असून, 1 डिसेंबरपासून पुढील 6 महिने महामार्गावरील दोन्ही महामार्गांवर 24 तास सुरक्षा तैनात ठेवण्यात येणार आहे.

अशी असणार सुरक्षा व्यवस्था

या सुरक्षेसाठी मोटार वाहन विभागातील मुंबई,पुणे,पनवेल,पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिका-यांच्या 12 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये 30 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येकी 6 पथके व 15 अधिकारी हे दोन्ही महामार्गांवर 24 तास सुरक्षा देणार आहेत.

कारवाई करणार

अपघातग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासोबतच अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करुन त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग करणा-यांवर तत्काळ कारवाई करणे, इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिजलद वाहनांवर कारवाई करणे,लेनची शिस्त न पाळणा-यांवर कारवाई करणे,सीटबेल्ट न वापरणा-या वाहनचालक आणि प्रवाशांना दंड करणे अशा उपाययोजना या उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 100 फूट खोल दरीत कोसळला ट्रक)

नियम पाळण्याचे आवाहन

रस्त्यावरील 80 टक्के अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा,वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होत असल्याचे एका शास्त्रीय विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.