देशातील तब्बल 24 वारसा स्थळे बेपत्ता आहेत. हा मुद्दा संसदेत वारंवार उपस्थित होत असल्याने, अखेर भारतीय पुरातत्त्व विभागाने (ASI) त्यांचा शोध सुरु केला आहे. एएसआयने अधिका-यांना ही स्थळे शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. सांस्कृतिक खात्याचे मंत्री जी.किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात 24 वारसा स्थळे बेपत्ता असल्याचे सांगितले.
या बेपत्ता वारसा स्थळांमध्ये स्मारक, मंदिर, बोद्ध भग्न वास्तू, कब्रस्तान, मीनार आदींचा समावेश आहे. बहुतांश स्थळे ही उत्तर प्रदेशातील आहेत. 24 वारसा स्थळांची ही यादी बिटिशकालीन आहे. त्यानंतर अनेक गावे व शहरांची नावे बदलली आहेत. त्यामुळे अशा स्थितीत त्यांचा शोध घेणे कठीण आहे, असे एएसआयचे संचालक देवकीनंदन डिमरी यांनी सांगितले. अनेक वारसा स्थळांचे अभिलेख एएसआयला जतन करुन ठेवता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे भौगोलिक स्थान शोधणे कठीण झाले आहे.
( हेही वाचा: निवडणूक आयोगाकडून शिवसेनाला दिलासा; पुरावे सादर करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदतवाढ )
खोदकामात आढळे पुरातत्त्वीय अवशेष
देशात संरक्षित स्थळांची संख्या 3 हजार 864 एवढी आहे. त्यातील 24 स्थळे गायब आहेत. 14 स्थळांचा नागरीकरण व धरणांमुळे बळी गेला. अल्मोडाचे कुटुम्बरी देवीचे मंदिर बेपत्ता होते. मात्र, ते कोसळल्यानंतर ग्रामस्थ अवशेष घेऊन आले आणि मंदिर पुरातत्वीय नकाशावर आले.
नव्या विधेयकाला विरोध
- अनेक वारसा स्थळे पर्यटन स्थळे बनू शकली नाहीत. त्यामुळे स्थानिक लोकांना त्यांचे महत्त्व कळत नाही, अशा स्थितीत ती एखाद्या रस्त्यात येत असतील तर त्यांचे संरक्षण होणे कठीण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- ऐतिहासिक स्थळांच्या आसपास बांधकामावरील निर्बंध सैल करण्यासाठी गेल्या जानेवारीत एक विधेयक लोकसभेत मांडले.
- अनेक खासदारांनी त्याला विरोध केला होता. हे विधेयक आता राज्यसभेत आहे. पुरातत्त्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांच्या या विधेयकाला विरोध आहे.