कोल्हापूरातून एका छोट्याशा गावातून ब्रेन ट्युमरच्या उपचारांसाठी मुंबईत आलेल्या एका शेतकरी कुटुंबाने २४ वर्षीय तरूणीचे मृत्यूपश्चात अवयवदान केले. मुलीचे पुढच्या महिन्यांत लग्न असताना खूप गंभीर अवस्थेत तिला मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारांसाठी आणले गेले. डोकेदुखी असह्य झाल्याने मुलीला तातडीने शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. तरुणीने मृत्यूपश्चात यकृत, मूत्रपिंडे, फुफ्फुस दान केल्याने चार जणांना जीवनदान दिले.
( हेही वाचा : ५ लाख गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! सरकार राबवणार ‘अमृत महाआवास अभियान’)
नेमकी घटना काय
गंभीर अवस्थेतच शनिवारी जसलोक रुग्णालयात २४ वर्षीय तरुणीला दाखल करण्यात आले. तिला ब्रेन ट्युमर असल्याने तातडीने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही. अखेर सोमवारी तरुणीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी कुटुंबीयांना माहिती दिली. रुग्ण मृत अवस्थेत पोहोचल्यानंतरही त्याच्या शरीरातून अवयवदान केल्यास इतर गरजू रुग्णांना नवे जीवनदान मिळते, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी दिली. ही माहिती मिळताच तरुणीच्या आईने अवयव प्रत्यारोपणाला संमती दिली. मुलीकडून अवयव दान झाल्यास इतरांच्या घरांतील मुलांचे प्राण वाचतील, असे त्या अशिक्षित शेतकरी आईने सांगताच रुग्णालयात सर्वजण हळहळले. शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना केवळ माणूसकीच्या नात्याने या शेतकरी कुटुंबीयांनी अवयवदान केल्याने डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचारी टीमनेही त्यांना धन्यवाद दिले. ही घटना आयुष्यात कायमच स्मरणात राहील, अशी भावना रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community