मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असून मागील सप्टेंबर महिन्यांत हिवताप आणि डेंगीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झालेली असतानाच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात हिवतापाचे २११ आणि डेंगीचे २५० रुग्ण आढळून आले आहेत. तर लेप्टोस्पायरेसिस व ग्रॅस्ट्रोच्या आजाराचे रुग्ण कमी झाल्याचे दिसत आहेत. मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने, एचबीटी दवाखाने, अतिरिक्त खासगी प्रयोगशाळा, खासगी रुग्णालये आदींमधून रुग्णांची ही आकडेवारी समोर आली आहे. (Mumbai Dengue-Malaria)
मागील आठवड्याच्या तुलनेत मलेरिया व डेंगीसहित सर्व आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. हिवतापाचे जुलै महिन्यात ७२१ रुगण, ऑगस्ट महिन्यात १०८० रुग्ण आणि सप्टेंबर महिन्यात १३१३ रुग्ण आढळून आले असून मागील आठ दिवसांमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात २११ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंगीच्या जुलै महिन्यांत ६८५, ऑगस्ट महिन्यात ९९९, सप्टेंबर महिन्यात १३६९ तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात २५० नवीन रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेप्टोचे ११, गॅस्ट्रोचे ९२, हेपेटायटीसचे १३, चिकन गुनियाचे ७ आणि एच१ एन१ चे १० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. (Mumbai Dengue-Malaria)
(हेही वाचा – Pune : पुण्याच्या तरुणाने ब्रिटनमध्ये राखली भारताची शान, वाचा…नेमकं काय घडलं?)
मागील आठ दिवसांमध्ये ताप ग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण करताना साडेतीन लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १७ लाख ५० हजार लोकांची तपासणी करण्यात आली. तर ग्रॅस्टोच्या आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी ८४० घरांमधील लोकांच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले, तर लेप्टोच्या आजाराच्या प्रतिबंधक उपाय म्हणून विषारी गोळ्या वापरुन ४२० उंदिर तसेच घुशी मारण्यात आले आहे. तसेच डेंग्युच्या नियंत्रणासाठी ३ लाख २४ हजार ५८२ घरांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ३ लाख ४५ हजार २१० कंटेनरची तपासणी करण्यात आली. यात ५ हजार १०२ एडीस डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली आहेत. (Mumbai Dengue-Malaria)
हिवताप आणि डेंगीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यामध्ये त्यांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि डासांचा दंश टाळण्यासाठी पूर्ण कपड्यांच्या वापर करावा, असे आवाहन केले आहे. नको असलेल्या पत्र्याचा डबा, थर्माकोलचे डबे, नारळाच्या करवंट्या, टायर यांसारख्या वस्तू काढून टाकाव्यात तसेच घरांभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच ताप, डोकेदुखी, पुरळ, स्थायू आणि सांधेदुखी, उलट्या किंवा जुलाब असल्यास स्वत: औषधोपचार न घेता ताबडतोब आपल्या जवळच्या महापालिका आरोग्य केंद्र, दवाखाना, रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा. उपचारास उशिर झाल्यास गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यू ही होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Mumbai Dengue-Malaria)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community