मध्य रेल्वे मार्गावरील 150 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन कर्नाक पूल तोडण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. यासाठी तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक जारी करण्यात आला होता. दरम्यान हा ब्रिज पाडण्याचे काम वेळेआधीच पूर्ण झआले असून, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेने २७ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. त्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11.00 ते 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, 7वी लाईन आणि यार्डवर मेगाब्लॉक करण्यात आला होता.
(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत
मात्र, हे काम वेळेआधीच पूर्ण झाल्यामुळे अप आणि डाउन धिम्या मार्गावर आणि अप आणि डाउन जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक शेड्यूलपूर्वी पूर्ववत करण्यात आली. या ब्लॉकनंतर रविवारी पहिली लोकल ट्रेन 03.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्यासाठी सुटली जी कर्नाक ब्रिज डिस्मेंटलिंग साइट येथून 4.00 वाजता पास झाली.
हार्बर मार्गही रुळावर
हार्बर मार्गही वेळापत्रकाच्या आधी 5.46 वाजता पूर्ववत करण्यात आला. हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल- वडाळा लोकल वडाळा येथून 5.46 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 5.52 वाजता सुटली. 7वी लाईन आणि यार्डचे काम प्रगतीपथावर आहे आणि शेड्यूल प्लॅनपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Join Our WhatsApp Community