गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावर एक कुरिअर सर्व्हिसची गाडी काही कुरिअर घेऊन जात होती. या गाडीवर चोरट्यांनी डल्ला टाकला (Robbery) आणि सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी आता या चोरट्यांना अटक केली. देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार, आकाश रामप्रकाश परमार, हुबसिंग मुल्लासिंग ठाकूर, शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर आणि जहिर खान सुखा खान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी हुबसिंग ठाकूर आणि जहिर खान हे माजी सैनिक आहेत.
अटक करण्यात आलेल्यांना 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी अडीच किलो सोने आणि 45 किलो चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना मुंढेगाव शिवारात घडली होती. चोरट्यांनी कुरिअर गाडीला अडवले. हे दरोडेखोर कारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी वाहनातील व्यक्तींना धाक दाखवला आणि गाडीतील ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या दरोड्यात दोन माजी सैनिकांचाही समावेश आहे.
नेमके काय घडले?
18 जानेवारी रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात बजरंग कुरिअर सर्व्हिस कंपनीची कुरिअर व्हॅन मुंबईकडून नाशिककडे प्रवास करत होती. यावेळी कारमधून आलेल्या पाच ते सहा संशयितांनी कुरिअर व्हॅनला अडवले. तसेच कुरिअर व्हॅनच्या चालकाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर व्हॅनमधील इतरांना लोखंडी रॉडचा धाक दाखवण्यात आला. व्हॅनमधील 3 कोटी 67 लाख 55 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली.
Join Our WhatsApp Community