पैठण येथील दक्षिण जायकवाडीला जोडणाऱ्या पुलावरून एक कार कोसळल्याने कार मधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पैठण येथील एका खासगी रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कार मधून प्रवास करणाऱ्या तिघांचे नशीब बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे पुलाला कठडे नसल्याने आतापर्यंत दोन ते तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास जुने कावसन येथील शेतकरी उद्धव भगवान मापारी हे कारने आपल्या पत्नीसह जुने कावसनकडे जात असताना नाथसागर पायथ्याशी कठडे नसलेल्या पुलावरून चालकांचे नियंत्रण सुटल्याने कार (एमएच २० एनजे २७७८) थेट नदी पात्रात कोसळली. यात उद्धव भगवान मापारी (३९), वर्षा उद्धव मापारी (३५), कारचालक राम अरुण चेडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी नदी पात्रात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी पुलाजवळ असलेल्या नागरिकांना कार कोसळल्याचे कळताच पोहता येणाऱ्या नागरिकांनी पुलावरून नदी पात्रात उड्या मारल्या. कारमधील चालकासह दोघांना पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान कार पात्रात कोसळल्याने अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
(हेही वाचा – सहलीसाठी गेलेली ४० विद्यार्थ्यांची बस उलटली; ४ विद्यार्थी गंभीर, १० जखमी)
Join Our WhatsApp Community