शौचालयाच्या टाकीत पडून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

129

कांदिवली चारकोप येथे तुंबलेल्या शौचालयाच्या टाकीची साफसफाई करताना सदर टाकीत पडून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलीस कार्यवाही सुरू आहे. अशा प्रकारे साचलेल्या टाक्या या यांत्रिक पद्धतीने साफ करण्याची प्रक्रिया असताना संस्था चालकाने मनुष्याचा वापर करत त्याद्वारे ही टाकी साफ करण्याचा प्रयत्न केल्याने या संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इमारत बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांना सेफ्टी बेल्ट बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मोठे नाले, विहिरी, शौचालयांच्या टाक्या आदींची साफसफाई करतानाही कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी बेल्ट लावणे बंधनकारक करावे. तसेच, साफसफाईची कामे करताना दुर्दैवाने जर कामगारांचा मृत्यू झाल्यास त्या कामगारांच्या कुटुंबियांना संबंधित कंत्राटदाराने आर्थिक मदत भरपाई स्वरूपात द्यावी.
– कमलेश यादव, माजी नगरसेवक (भाजप)

खासगी संस्थेला दिलेले काम

कांदिवली (पश्चिम), चारकोप, लिंक रोड, अथर्व कॉम्प्लेक्ससमोरील एकता नगर येथे महापालिकेच्या सुलभ शौचालयाची टाकी तुंबल्याने ती साफ करण्याचे काम संबंधित संस्थेने एका खासगी संस्थेला दिले. या खासगी संस्थेने चार कामगार ही टाकी साफ करण्यासाठी पाठवली. हे कामगार गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही टाकी साफ करत असताना त्यातील एक कामगार तोल गेल्याने त्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी इतर दोन कामगार मदतीला धावले. मात्र तेसुद्धा तोल जाऊन त्याच टाकीत पडले. त्यांच्या नाका तोंडात टाकीतील घाण गेल्याने व त्यांचा श्वास कोंडला गेला. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तिघांना काही वेळाने टाकीतून बाहेर काढून नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टर राहुल यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या मृत कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

(हेही वाचा ‘ऑपरेशन गंगा’ला प्रांतवादाशी जोडले जाणे चुकीचे! पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल)

यांत्रिक पद्धतीने टाकी साफ केली जाते

सुदैवाने चौथा कामगार त्या टाकीत पडता पडता बचावल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी दिली. याबाबत आर दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सार्वजनिक शौचालयाची टाकी साफ जर भरली गेली तर ती साफ करण्याची मार्गदर्शक तत्वे आहे. त्यांनी याची कल्पना महापालिकेला द्यायला हवी होती, तसेच मनुष्यांच्या माध्यमातून ही सफाई केली जात नाही. ती यांत्रिक पद्धतीने साफ केली जाते. त्यामुळे याबाबतची पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.