मुंबईत तरुणांमधील चुकीच्या जीवनशैलीच्या सवयीमुळे मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास सुरु होत असल्याचे विविध अहवालांतून उघडकीस आले आहे. एफ-उत्तर, एच-पूर्व, के-पूर्व, पी-उत्तर, एम-पूर्व आणि एल या सहा विभागांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. वर्षभरात ३० वयोगटापुढील १ लाख ८३ हजार ६८२ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाबाचे ६ हजार ६३२ तर मधुमेहाचे ४ हजार ५४०चे नवीन रुग्ण आढळले. असंसर्गजन्य आजारांची गांभीर्यता लक्षात घेत पालिका आरोग्य विभागाने सर्व २४ विभागांतील झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: LPG ग्राहकांना मोठा झटका; गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय )
येत्या डिसेंबर महिन्यापासून या चाचणीला सुरुवात होईल. आरोग्य चाचणीत प्रामुख्याने ३० वर्षांपुढील व्यक्तींची उच्च रक्तदाब चाचणी तसेच असंसर्गजन्य आजारांविषयीची माहिती घेतली जाईल. मुंबईतील सहा विभागांत घरोघरी असंससर्गजन्य आजारांची दिशा हा कार्यक्रम राबवल्यानंतर आता मुंबईरातील वस्त्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाईल. पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एफ-उत्तर, एच-पूर्व, के-पूर्व, पी-उत्तर, एम-पूर्व आणि एल या सहा विभागांमध्ये आढळून आलेल्या नव्या नोंदीतील उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्तांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. या रुग्णांना पालिका रुग्णालये तसेच दवाखान्यात भारतीय आहारतज्ज्ञ संस्थेच्यावतीने आहाराविषयक सल्लाही मोफत दिला जात आहे. गेल्या वर्षभरात पालिका रुग्णालये तसेच दवाखान्यात भेट देणा-या तब्बल २४ हजार २३० रुग्णांना आहार तसेच जीवनशैली बद्दल समुपदेशन देण्यात आले आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको –
- वारंवार लघवीला होणे
- अचानक तहान लागणे
- अंधुक किंवा अस्पष्ट दिसणे
- हाय-पाय सुन्न होणे, सूज येणे
- पायामध्य़े जखम होणे (अल्सर होणे)