गणपतीला कोकणात जाणे महागले! विशेष रेल्वे गाड्यांचे तिकीट दर ३० टक्के अधिक

गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी १७२ विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यातील २४ फेऱ्यांना विशेष भाडे आकारणी करण्यात येणार असून अनियमित धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा या गाड्यांचे तिकीट दर ३० टक्के अधिक आहेत. त्यामुळे गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

( हेही वाचा : Megablock update : प्रवाशांचा खोळंबा! रविवारी बाहेर पडण्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट)

आरक्षण फुल्ल

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर या वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी विशेष एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या सर्वच गाड्यांचे बुकिंगदेखील सुरू झाले असून २० ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंतच्या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परतीच्या ३ ते १० सप्टेंबरपर्यंतच्याही गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

तिकीट दर ३० टक्के अधिक

गणेशोत्सवातील विशेष गाड्यांमधील २४ गाड्यांना रेल्वे प्रशासनाने विशेष भाडे आकारणी केली आहे. त्यामध्ये मुंबई सेंट्रल ते ठोकूर, मुंबई सेंट्रल ते मडगाव, वांद्रे ते कुडाळ, उधना ते मडगाव, कुडाळ ते अहमदाबाद या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण १८ जुलैला सुरू झाले. या गाड्यांनाही चाकरमान्यांकडून पसंती राहिली असून आरक्षणाही फुल्ल झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार्या कोकणकन्या, मांडवी, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस आदी गाड्यांना मुंबई ते कणकवलीपर्यंतच्या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ३३५ ते ३४० रुपयांची तिकीट आकारणी केली जाते. मात्र स्पेशल भाडे असलेल्या गाड्यांना मुंबई ते कणकवली या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ४३० रूपये मोजावे लागले आहेत. तिकीट दर जास्त असले तरीही या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here