आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणचे हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना होत असलेल्या अडचणींबाब पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे.
( हेही वाचा: Post Office मध्ये गुंतवणूक करा! बॅंकेपेक्षा अधिक परतावा; जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना! )
54 लोकांचा मृत्यू
राज्यातील 35 जिल्ह्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, घरे पाण्याखाली जात आहेत.