एसी लोकलला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या ३१ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात येईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या चर्चगेट, विरार, बोरीवली, दादर, मालाड या स्थानकांदरम्यान होणार आहेत.
( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत)
पश्चिम रेल्वेवर ७९ फेऱ्या
पश्चिम रेल्वेवर ८ ऑगस्टपासून ८ एसी लोकलच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ झाली होती आता यात जवळपास ३१ फेऱ्यांची भर पडणार आहे त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या एकूण ७९ फेऱ्या होणार आहेत. एसी लोकलच्या तिकीट दरात मे महिन्यात कपात झाल्यानंतर या लोकलला मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये वाढ झाली. प्रामुख्याने पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी व सायंकाळच्यावेळी एसी लोकलला एवढी गर्दी होते की एसी लोकलचे दरवाजेही बंद न होण्याच्या घटना अलिकडे घडल्या आहेत याचे व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता एसी लोकलच्या ७९ फेऱ्या झाल्यावर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेवर कळवा, बदलापूर येथे प्रवाशांनी एसी लोकलला केलेल्या विरोधानंतर १० फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community