मुंबईत ३१ वे अवयवदान

124

मुंबईतील परळ येथील ग्लोबल रुग्णालयात या वर्षातील ३१ वे अवयवदान झाले. 53 वर्षीय महिलेकडून मृत्यूपश्चात दोन मूत्रपिंडे आणि यकृत दान करण्यात आले. लालबाग येथील महिलेने मरणानंतर अवयवदान केले. महिलेचा पती आणि मुलाने अवयवदानासाठी संमती दिली. ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा सरला तरीही अद्याप मुंबईत अवयवदान संथगतीने सुरु आहे. मुंबईत दर वर्षाला किमान ४१च्या जवळपास अवयवदान होते. येत्या दोन महिन्यात अवयवदान चळवळीला वेग येईल का, याबाबतीतही वैद्यकीय क्षेत्रातून शंका उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : आदर्श महापौर पुरस्कारासाठी मुंबईतील या ५० शिक्षकांची झाली निवड )

अवयवदान केलेल्या महिलेला डोकेदुखीचा आणि चक्करचा त्रास होत असल्याने शुक्रवारी कुटुंबियांनी तिला ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. तपासाअंती महिलेला पक्षाघाताचा त्रास होत अतिरक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. या महिलेला शनिवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. पक्षाघाताचा त्रास होऊ लागला की रुग्णाला 45 मिनिटांत रुग्णालयात दाखल करावे लागते. या अवधीला वैद्यकीय भाषेत गोल्डन अवर असे संबोधले जाते. मात्र पक्षाघाताची लक्षणे ओळखण्याबाबत अद्याप समाजात जनजागृती नसल्याने कित्येकदा रुग्णाला वेळीच उपचार मिळत नाही. परिणामी, रुग्ण दगावतो. अशा स्थितीत रुग्ण काही तासांनी मरण पावतो, दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरातील अवयव दान करता येतात, अशी माहिती अवयवदान समन्वयकांनी कुटुंबियांना दिली. अखेरीस रविवारी कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. त्यातून दोन मूत्रपिंडे आणि यकृत दान करण्यात आले. या अवयवदानामुळे तीन गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.