मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ३४ दवाखाने उभारणार

मुंबईत रुग्णांना प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून दवाखाना तसेच आरोग्य केंद्रांची सुविधा महापालिकेच्यावतीने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये दवाखानेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता झोपडपट्टी भागांमध्ये पोर्टा कॅबिनमध्ये दवाखाने उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ३४ पोर्टा कॅबिन दवाखाने लवकरच जनतेसाठी बनवले जाणार असून, याबाबतची कार्यवाही आता शेवटच्या टप्प्यात आहे.

जागेअभावी अडचणी 

मुंबईत दवाखान्यांमध्ये जास्तीत जास्त प्राथमिक उपचार देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून, यासाठी दवाखान्यांची संख्या वाढवणेही आवश्यक आहे. त्यामुळे दवाखान्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आता महापालिकेने पाऊल उचलले आहे. दवाखान्यांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दवाखान्यांच्या वास्तूंचे बांधकाम करण्यात अडचणी येत आहेत.

पोर्टा कॅबिन उभारणार

विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये दवाखान्यांची उभारणी जास्तीत जास्त करण्याचा महापालिकेचा विचार आहे. परंतु त्याठिकाणी दवाखाने उभारण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने आता महापालिकेने पोर्टा कॅबिन बांधून त्यात दवाखान्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३४ ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये अशाप्रकारे पोर्टा कॅबिनमध्ये दवाखाने उभारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

34 जागा निश्चित

महापालिकेचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने उभारण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने सुरू असल्याचे सांगितले. झोपडपट्ट्यांमध्ये जागा नसल्याने आता पोर्टा कॅबिन उभारुन त्यात दवाखाने सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे ६० पोर्टा कॅबिनसाठी निविदा मागवली आहे. त्यातील ३४ जागा निश्चित झाल्याने तिथे या दवाखान्यांची उभारणी केली जाणार आहे.

या दवाखान्यांसाठी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. शिवाय यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे व इतर साहित्य यांच्या खरेदीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच हे साहित्य व डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये झोपडपट्टी भागांमध्ये दवाखान्यांची सुविधा जनतेला उपलब्ध होईल,असा विश्वास डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here