मुंबईतील ३४ टक्के नागरिकांना रक्तदाब; १८ टक्के मुंबईकरांचा उपाशीपोटी वाढतोय मधुमेह

93

मुंबईतील ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याची बाब महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने भागीदारी राबवलेल्या डब्लूएचओ स्टेप सर्व्हेतून समोर आली आहे. याशिवाय लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तिंमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो. मुंबई शहरात साधारणतः १८ टक्के मुंबईकरांचे उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाण पेक्षा अधिक असल्याचा निष्कर्षही नोंदवला गेला आहे.

डब्लूएचओ स्टेप सर्वेक्षण हे असंसर्गजन्य रोग विभागाचे मुंबई महानगरपालिका पथक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली, निलसन आईक्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्वतंत्र संशोधन संस्थेद्वारे आरोग्य संबंधित डेटा संकलन करण्यात आला. तसेच मुंबई सर्वेक्षणामधून प्राप्त निष्कर्षांना अंतिम रूप देण्यासाठी केईएम, नायर, सायन आणि कूपर यासारख्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचा सहभाग मिळाला व दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व्यक्तिंच्या असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात आले. स्टेप सर्वेक्षण मुंबई उपनगरासह मुंबई शहरात ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिसऱ्या टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ५ हजार ९५० प्रौढांशी संपर्क साधण्यात आला, यापैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचा आता औरंगाबादचे नामकरण प्रशासकीय पातळीवर कसे होणार? फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया )

१८-६९ वर्षे वयोगटातील सुमारे ३७ टक्के सर्वेक्षण व्यक्तींमध्ये (जवळपास १० पैकी ४ मुंबईकर) खालील ६ जोखीम घटकांपैकी ३ किंवा अधिक जोखीम घटक असल्याचे नोंदवले गेले.

  • सध्याचे दैनिक धुम्रपान करणारे
  • दररोज शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी फळे आणि भाज्या खाणे
  • अपुरा शारीरिक व्यायाम
  • लठ्ठपणा
  • वाढलेला रक्तदाब किंवा सध्या वाढलेल्या रक्तदाब साठी औषधोपचार करत आहे
  • वाढलेली रक्तातील साखर किंवा सध्या वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्ती.

वाढलेला रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब: (≥१४०/९०)

मुंबईत, ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे, त्यापैकी ७२ टक्के नागरिक हे सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले आहे. जे उपचार घेत होते, त्यापैकी फक्त ४० टक्के नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आला.

वाढलेली रक्तातील साखर किंवा मधुमेह:

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये, टाइप २ हा जास्त प्रमाणात असून भारतातील वृद्ध लोकांना (सामान्यतः ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या) प्रभावित करतो. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तिंमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो.

• मुंबई शहरात साधारणतः १८% मुंबईकरांचे उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाण पेक्षा अधिक आहे. (रक्तातील वाढलेल्या साखरेच प्रमाण म्हणजे उपाशीपोटी साखरेचे प्रमाण ≥ १२६ mg/dl)

• प्री-डायबेटिस- (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५.६% आहे. (रक्तातील साखरेचे प्रमाण ≥ ११० mg/dl आणि < १२६ mg/dl) आणि जर अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर अशा व्यक्तिंना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो.

• ८२% व्यक्ती हे सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेसाठी उपचार घेत होते (ज्यांना पूर्वी रक्तातील साखर वाढल्याचे निदान झाले होते)
• जे उपचार घेत होते त्यापैकी फक्त ४२% व्यक्तिंना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात असल्याचे आढळून आले.

• ८.३% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले.

(हेही वाचा उद्धव ठाकरे सिंहाचा छावा…, केजरीवालांकडून साखरपेरणी; नव्या आघाडीचे संकेत?)

वाढलेला कोलेस्टेरॉल :

कोलेस्टेरॉल हे HDL (चांगले) आणि Non-HDL (हानिकारक) कोलेस्टेरॉल या दोन्हींचे मिश्रण आहे. व्यक्तिच्या एकूण कोलेस्टेरॉल पातळीचे प्रमाण ≥ १९० mg/dl असल्यास, त्या व्यक्तीची कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असे मानले जाते.

• या सर्वेक्षणात, सुमारे २१% व्यक्तिंना (५ पैकी १) एकूण कोलेस्ट्रॉल ≥ १९० mg/dl वाढलेले आढळले किंवा सध्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत आहेत.

मुंबईत १२ टक्के नागरिक करतात तंबाखूचे सेवन

जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखूमुळे दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७ दशलक्षाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या सेवनामुळे होतात. सर्वेक्षणानुसार एकूण तंबाखूच्या वापराचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यापैकी १२ टक्के नागरिक दररोज तंबाखूचे सेवन करतात. हे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. मौखिक तंबाखूच्या (मशेरी, गुटखा, पान मसाला, खैनी) वापराचे प्रमाण सुमारे ११ टक्के इतके आहे, जे खूप जास्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.