३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज! सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

बिगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे आढळून आली आहेत. यावरून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करणे योग्य राहील, असे सेरो चाचणी अहवालात म्हटले आहे.

125

मुंबईतील नागरिकांची तिसरी सेरो चाचणी नुकतीच करण्यात आली आहे. नमुना निवड पद्धतीचा वापर करण्यात आलेल्या या सेरो सर्वेक्षणात मुंबईतील १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली असून यापैकी ३६.३० टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात संबंधित प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळून आली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील सेरो सकारात्मकतेची टक्केवारी कमी होत असून बिगर झोपडपट्टी परिसरामध्ये सेरो सकारात्मकतेमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

तीन वेळा केले सेरो सर्वेक्षण!

कोविड या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचे असते. याच दृष्टीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सेरो चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने मुंबईतील नागरिकांचे पहिले सेरो चाचणी सर्वेक्षण तीन विभागांत जुलै २०२० मध्ये करण्यात आले होते. तर दुसरे सेरो सर्वेक्षण हे त्याच तीन विभागांत ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर आता मार्च २०२१ मध्ये सर्व २४ विभागांत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष हाती आले आहेत.

(हेही वाचा : महापालिका रुग्णालयांत ऑक्सिजन, सर्वसाधारण खाटा रिकाम्या!)

बिगर झोपडपट्टीतील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिबॉडीज आढलल्या!

सेरो चाचणी ज्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशाच व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची चाचणी यंदाच्या सेरो सर्वेक्षणात करण्यात आली आहे. या सर्व रक्त नमुन्यांची प्रतिपिंड विषयक चाचणी महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय परिसरात असणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील सेरो सकारात्मकतेची टक्केवारी कमी होत असून बिगर झोपडपट्टी परिसरामध्ये सेरो सकारात्मकतेमध्ये वाढ होत आहे. सध्या कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे सापडत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब लक्षात घेतल्यास सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष हे संबंधित परिस्थितीशी जुळत असल्याचे दिसून येत आहे. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने लसीकरण मोहीम अधिक गतिमान करणे योग्य राहिल, असेही नमुद करण्यात आले आहे.

यंदाच्या सेरो सर्वेक्षणाचे ठळक निष्कर्ष!

  • सेरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ३५.०२ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली. तर महिलांमध्ये ३७.१२ टक्के इतकी सरो सकारात्मकता आढळून आली.
  • यंदाच्या सेरो सर्वेक्षणादरम्यान महापालिका दवाखान्यातून झोपडपट्टी परिसरातून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये ४१.६ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात झोपडपड्डी विभागांत ५७ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात ४५ टक्के इतकी सेरो सकारात्मकता झोपडपड्डी विभागांत आढळून आली होती.
  • तर प्रयोगशाळेतून बिगर झोपडपट्टी परिसरातून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये यंदा २८.५ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात बिगर झोपडपट्ठीतील टक्केवारी १६ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात १८ टक्के इतकी सेरो सकारात्मकता बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आढळून आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.