राज्यात शनिवारी कोरोनाचे 399 नवे रुग्ण आढळले असून 406 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीा आहे. महत्वाचे म्हणजे शनिवारी राज्यात एक्सबीबी व्हेरिअंटचे 36 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सहा रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग झाला. या व्हेरिएंटचा तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हा व्हेरिएंट सौम्य स्वरुपाचा आहे पण मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकारांच्या रुग्णांबाबत टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे.
या एक्सबीबी व्हेरिअंटचे पुण्यात 21,ठाण्यात 10,नागपूर येथे 2 तर अकोला,अमरावती आणि रायगड जिल्ह्यांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. या नव्या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सची एक बैठक 24 ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी टास्क फोर्सकडून या व्हेरिअंटबाबत माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः गडचिरोलीत सौम्य भूकंपाचे धक्के)
टास्क फोर्सने दिली माहिती
राज्यातील तसेच सिंगापूर आणि इतर देशांमधील एक्सबीबी या व्हेरिअंटचा अभ्यास करता या नव्या व्हेरिअंटमुळे संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले तरी हा नवा व्हेरिअंट सौम्य स्वरूपाचा आहे आणि यातील बहुसंख्य रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार देणे शक्य आहे. अगदी कमी रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करावयाची गरज भासेल, असे टास्क फोर्सने सांगितले आहे.
नियमित मॉनिटरिंगची गरज
लॉन्ग कोविड सिंड्रोमबद्दल कोविड टास्क फोर्स सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या राज्यात मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकारांच्या घटनांमध्ये काही वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच कोविड होऊन गेलेल्या रुग्णांचे नियमित मॉनिटरिंग आणि पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन टास्क फोर्सने केले आहे.
Join Our WhatsApp Community