शनिवारी दिवसभरात नागपूरात ओमायक्रॉनचे ३९ नव्या रुग्णांची नोंद झाली. या नोंदीमुळे नागपुरात आतापर्यंत ९० ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यातील विविध भागांतून एकूण १२८ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण सापडले.
राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झाली १ हजार ७३०
नागपूरसह पुणे आणि सोलापुरात यंदाच्या आठवड्यात एका दिवसात पन्नासहून जास्त रुग्ण आढळून येत आहे. ज्या भागात एका दिवसात ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त दिसून येत आहेत, त्यात कुटूंबातील व्यक्ती तसेच सहसंपर्कातून ओमायक्रॉनची बाधा पटकन झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शनिवारी नागपुरात ३९ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबईत २४, मीरा-भाईंदरमध्ये २०, पुणे शहरात ११, अमरावतीत ९, अकोल्यात ५, पिंपरी-चिंचवडमध्ये ३, औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण भागांत आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी २ नव्या रुग्णांची नोंद झाली. नाशिक, कोल्हापूर, सातारा, ठाणे आणि वर्ध्यातही प्रत्येकी एका रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झाली.
(हेही वाचा राज्यातील सरकारी रुग्णालयातील ५९८ निवासी डॉक्टर, वॉर्डबॉयलाही कोरोना)
- शनिवारी ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद – १२८
- आतापर्यंतच्या राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या – १ हजार ७३०
- आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेले रुग्ण – ८७९
- राज्यातील ओमायक्रॉनबाधित सक्रीय रुग्णांची संख्या – ८५१