४.९८ टक्के मुंबईकर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर; दोघांपैकी ‘हा’ आजार जास्त बळावण्याची शक्यता

152

वाढत्या ताणतणावाची जीवनशैली जगणा-या मुंबईकरांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या वाढत असल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. शहरी जीवनमानात धावपळीच्या वेळापत्रकात या दोन्ही आजारांमधील वाढ नियंत्रित असावी, या हेतूखातर पालिका आरोग्य विभागाने तीस वयोगटापुढील रुग्णांची तपासणी केली असता ४.९८ टक्के तीशीपार मुंबईकर उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून आले. त्यापैकी उच्च रक्तदाबाची समस्या तिशीपार तरुणांमध्ये जास्त वाढत असल्याचे संकेतही पालिका आरोग्य विभागाच्या तपासणीतून आढळले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेक्षणानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पाच प्रमुख पालिका रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागाला भेटी देणा-या तीस वयोगटापुढील रुग्णांची तपासणी सुरु केली होती. पाच वैद्यकीय महाविद्यालये, ६ उपनगरीय रुग्णालये तसेच ४ विशेष रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात असंसर्गिक आजारांविषयी माहिती देणा-या विभागाची सुरुवात करण्यात आली. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब याविषयी माहिती दिली गेली. आजारांची गांभीर्यता लक्षात घेत त्यांच्या जीवनमानात आवश्यक बदल करण्याबाबतही माहिती दिली जात आहे.

( हेही वाचा: राज्यात गारठा वाढला: मंगळवारी जळगाव आणि नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद )

पालिका आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीतीत विविध आजारांच्या उपचारांसाठी येणा-या तिशीपार रुग्णांना या विभागात तपासले गेले. या कालावधीत तब्बल २६ हजार २५७ रुग्णांनी असंसर्गिक आजाराविषयी माहिती देणा-या विभागाला भेट दिली. त्यापैकी १ हजार ३०७ रुग्णांमध्ये दोन्ही आजारांची लक्षणे आढळून आल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

तणावग्रस्त परिस्थितीचा जास्त काळ सामना केल्यास उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या जाणवते. दोन्ही आजार दीर्घकालीन स्वरुपाचे असतात. पालिका आरोग्य विभागाच्या तपासणीत २६ हजार २५७ रुग्णांपैकी ३ हजार ३४८ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळली. तर ३ हजार ५५ रुग्णांना मधुमेहाची लक्षणे आढळली. टक्केवारीनुसार १२.७५ रुग्ण उच्च रक्तदाब तर ११.६३ टक्के रुग्ण मधुमेह या आजारासाठी संशयित असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणात आढळले. या रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.