भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारवाई केल्यानंतर हे घुसखोर पुन्हा भारतात घुसखोरी करून नवीन नावाने बोगस कागदपत्रे तयार करून भारतात पुन्हा वास्तव्य करीत असल्याची धक्कादायक बाब एटीएसने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. त्याच बरोबर अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएसच्या जुहू युनिटने मुंबईतील चार विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, जामिनावर बाहेर पडल्यावर पुन्हा नव्या कागदपत्रासह मुंबईत वास्तव्य करीत होते.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एकाने लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) मुंबईतील जोगेश्वरी येथे बोगस मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मालाड मालवणी, जोगेश्वरी, चेंबूर माहुल गाव येथून या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले असून त्यातील एकाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांग्लादेशीवर भारतात बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे मुंबईत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने चारही बांगलादेशींवर कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. सह कलम १२ (१A) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन भारतीय पारपत्र प्राप्त करणाऱ्या खालील नमुद मुळच्या बांगलादेशी इसमांना अटक करण्यात आली. (Lok Sabha Election)
जामिनावर बाहेर पडल्यावर हे घुसखोर गुजरात राज्यातील सुरत येथे वास्तव्याला गेले, तेथे त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे पुरावे, पासपोर्ट तयार करून पुन्हा मुंबईत वास्तव्य करीत होते. मुंबई उपनगरात रिक्षा चालक चालक, फेरीचा व्यवसाय करून हे बांगलादेशी मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहत होते.राज्य एटीएसच्या जुहू युनिट या घुसखोरांची माहिती मिळाली असता सोमवारी या चार जणांना विविध परिसरातून अटक करण्यात आली. भारतीय पासपोर्टच्या आधारे अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशीयांनी अनेक वेळा आखाती देशात वारी केल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले असून या बांग्लादेशीचे दहशतवादी संघटनांशी सबंध असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
कोणला अटक केली?
रियाज हुसेन शेख (३३), सुलतान सिध्दीक शेख (५४), इब्राहिम शफिउल्ला शेख (४६) आणि फारूख उस्मानगणी शेख (३९) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Join Our WhatsApp Community