मुंबईतील रस्त्यांवर तसेच फूटपाथखालून विविध सेवांचे जाळे (युटीलिटीज) टाकण्यासाठी खोदण्यात आलेले चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते. परंतु या सर्वांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोविडमुळे या सर्व कंत्राटदारांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. या एका वर्षात ६० कोटींची भरणी करण्यात आली आहे.
पुन्हा मिळाली मुदतवाढ
मुंबई महापालिकेच्या जलअभियंता, बेस्ट यासह रिलायन्स केबल्स, टाटा आदी खासगी सेवा संस्थांकडून टाकल्या जाणाऱ्या केबल्ससाठी तसेच दुरुस्तीसाठी रस्ते व फूटपाथवर चर खोदले जातात. हे खोदलेले चर बुजवण्यासाठी मुंबईतील महापालिकेच्या सातही परिमंडळांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली. या सातही कंत्राटदारांचा कालावधी तीन वर्षांचा करण्यात आला. याची मुदत जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्यानंतर त्यांना सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु नव्याने काढलेल्या निविदांनाही विलंब झाल्याने आता ही मुदत ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली जात आहे.
४०० कोटी रुपयांचा खर्च
हे चर बुजवण्यासाठीचे मूळ कंत्राट हे ३३६ कोटी ६ लाख ७० हजार रुपयांऐवढे होते. परंतु आता या कंपन्यांना वाढीव दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ६० कोटी रुपयांचा निधी वाढवून दिला जात आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून चर बुजवण्यावर सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
निविदाच केली रद्द
चर बुजवण्याचा कालावधी सप्टेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येणार असल्याने महापालिकेने ५ ऑगस्ट २०२१ मध्ये निविदा मागवली होती. या निविदेत ६३ निविदाकारांनी भाग घेतला होता. यामध्ये कंत्राटदारांनी २७.८० टक्के आणि ३६.६० टक्के कमी दरात बोली लाऊन, काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या या निविदा कमी दर लाऊन मिळवण्याचा प्रयत्न झाल्याने ऑक्टोबर २०२१ रोजी ही निविदा रद्द करण्यात आली. त्यामुळे या चरींच्या पुनर्भरणीच्या कामांसाठी फेरनिविदा मागवण्यात येत आहे.
(हेही वाचाः शाळा, महाविद्यालये उघडली… आदिवासी आश्रमशाळा व निवासीशाळांचं काय?)
Join Our WhatsApp Community