Nashik : नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे दुष्काळसदृष्य घोषित; निफाड, नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर

या निर्णयामुळे ४६ महसुली मंडळातील गावांना दुष्काळी भागातील देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू होणार आहेत.

133
Nashik : नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे दुष्काळसदृष्य घोषित; निफाड, नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर
Nashik : नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे दुष्काळसदृष्य घोषित; निफाड, नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर

नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे दुष्काळसदृष्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय गुरुवारी (०९ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय निफाड आणि नांदगाव हे दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे ४६ महसुली मंडळातील गावांना दुष्काळी भागातील देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू होणार आहेत. (Nashik)

राज्य मंत्रिमंडळाच्या ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील ४० तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले होते. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर आणि मालेगाव तालुक्याचा समावेश होता. मात्र, नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुष्काळ जाहीर झाला नसल्याने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक आयोजित केली. या बैठकीत निफाड आणि नांदगाव या दोन तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आता पाच इतकी झाली आहे. (Nashik)

नाशिक जिल्ह्यात या वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. अनेक गावांमध्ये उशिरा पाऊस पडल्याने पेरणी उशिरा झाली. पेरणी नंतर चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस न आल्याने कापूस, मका, कांदा, भूईमूग, ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जमिनीतील पाणी पातळीत घट झाली आहे. खरीप हंगामातील संपूर्ण पिके वाया गेली आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनलेला आहे. अनेक गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा विचार करता लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. (Nashik)

त्यानुसार आज झालेल्या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे दुष्काळसदृश म्हणून घोषित करण्यात आली. नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र नाही. त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची पुन्हा बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचा देखील सामावेश आम्ही लवकरात लवकर या यादीमध्ये करू, असे भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे याबरोबरच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Nashik)

(हेही वाचा – Bomb Making Codewords : ‘शिरका’, ‘सरबत’, ‘गुलाबपाणी’ हे आहे दहशतवाद्यांचे बॉम्ब बनविण्याचे कोडवर्ड)

दुष्काळी म्हणून घोषित झालेली तालुकानिहाय महसुली मंडळे

निफाड: लासलगाव, देवगाव, नांदूर मधमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर.
नांदगाव: नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवल बुद्रुक.
नाशिक : नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे.
कळवण: कळवण, नविबेज, मोकभनगी, कनाशी.
बागलाण: सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर.
चांदवड: चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेर भैरव, वडळीभोई, दिघवद.
देवळा: देवळा, लोहोनेर, उमराणे. (Nashik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.