छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथा, त्यांचा राज्याभिषेक, राज्यातील गड-किल्ले असे सर्व प्रतिकृती स्वरूपात शिवसृष्टी (Shivsrushti) उभारण्याचे स्वप्न शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिले. त्यानुसार न-हे आंबेगाव येथे ही शिवसृष्टी (Shivsrushti) साकारण्याचे काम सुरूही झाले; पण मध्येच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यामुळे शिवसृष्टीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. आता गुजरात सरकारनेही यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे.
देणगीमधून शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु होणार
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शिवसृष्टीला (Shivsrushti) ५ कोटी रुपयांची देणगी दिली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. कुबेर म्हणाले की, शिवसृष्टीच्या रुपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाच कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला. मुख्यमंत्री पटेल यांना शिवसृष्टीची (Shivsrushti) संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले. या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या (Shivsrushti) दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार असून यामध्ये प्रतापगडावरील भवानीमाता मंदिराबरोबरच रंगमंडल, गंगासागर तसेच गेल्या ३५० वर्षांत शिवछत्रपतींच्या कल्पनेतील स्वराज्य संकल्पनेच्या दिशेने झालेली वाटचाल, मंदिरांचा जीर्णोद्धार, स्वभाषा, स्वधर्म या विषयात पुढील पिढ्यांनी केलेले कार्य याची माहिती देणारे दालन यांचा समावेश असेल, असे कुबेर म्हणाले.
Join Our WhatsApp Community