देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT Station) म्हणजेच सीएसटीएमटी स्थानकाच्या नामकरणाला लवकरच २४ वर्षे पूर्ण होतील. १९९६ साली या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस ऐवजी छत्रपती शिवाजी टर्मिनस असं करण्यात आलं होतं. जाणून घेऊयात लाखोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकाबद्दलच्या खास गोष्टी…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. १८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.
मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.
या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे. मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे.
स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला.
हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले. हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
२०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते. या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.