बाळासाहेबांच्या स्मारकावर आजवर झाला ५० कोटींचा खर्च

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील(शिवाजी पार्क) महापौर निवासस्थानाच्या परिसरात स्वर्गीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या बांधकामावर आतापर्यंत ५०कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यातील २१ कोटी रुपयांच्या खर्चाची रक्कम एमएमआरडीएला शासनाकडून अदा करण्यात येत आहे.

कंत्राटदाराची नेमणूक केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले. तर महापौर निवासाच्या परिसरात बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच्या फडणवीस सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक शासनाच्या निधीतून बनवून याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवली.

त्यानुसार राष्ट्रीय स्मारकासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून आराखडा तयार करून ४०० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार निविदा मागवून पात्र कंत्राटदाराची नेमणूक केल्यानंतर प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेची जाहीरात पाहिलीत का? जाहिरातीला मिळतेय प्रसिद्धी )

प्रकल्प कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १२ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे टप्पा-१ मध्ये स्थापत्य घटक व टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित घटकांचा समावेश आहे. या स्मारक प्रकल्पासाठी लागणारा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून स्वनिधीतून करावयाचा असून प्राधिकरणाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाने करावायाची आहे.

या स्मारक प्रकल्पासाठी एमएमआरडीएने ३० एप्रिल २०२२ पर्यंत ५०.४२ कोटी रुपये खर्च केला आहे. प्राधिकरणाने केलेल्या खर्चाची रक्कम एमएमआरडीएला देण्याकरता सन २०२२-२३ मध्ये १०० कोटी रुपयांएवढी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. या तरतुदींमधून २१ कोटी रक्कम सहाय्यक अनुदान स्वरूपात एमएमआरडीएला वितरित करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here