लसवंतांच्या संख्येत भारत झाला ‘यशवंत’… किती झाले लसीकरण?

भारतातील पात्र लोकसंख्येच्या 50% पेक्षा जास्त लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

108

कोविडविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून जगात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातही लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी मिळाल्यानंतर देशात लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. या मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भारताने आता नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत भारतातील 50% प्रौढ लोकसंख्येला कोविड-19 लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. भारताने एकूण ६१.१० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून,
भारतातील पात्र लोकसंख्येच्या 50% पेक्षा जास्त लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

61 कोटींचा टप्पा पार

भारताचं कोविड-19 लसीकरण 61 कोटींच्या पुढे गेलं आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. गुरुवारी सुमारे 68 लाख (67,87,305) लसींचे डोस देण्यात आले. सरकारच्या म्हणण्यानुसार, 2020च्या अंदाजे मोजणीच्या आधारावर 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील प्रौढांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 94 कोटी आहे. गुरुवारी भारताने 47.29 कोटी पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण केले, जे या प्रौढ लोकसंख्येच्या 50.30% आहे.

 

डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरणाचे लक्ष्य

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताने डिसेंबर 2021 पर्यंत 60% लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. डिसेंबरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशभरात दररोज 10.9 दशलक्ष डोस वितरित करावे लागतील, असे सांगण्यात येत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 99% आरोग्य सेवकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून, 83 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्व फ्रंट लाईन वर्कर्सना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे आणि 79 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.

अशी आहे राज्यांची कामगिरी

हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवा यांसारख्या छोट्या राज्यांमध्ये सिंगल-डोस लसीकरण राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले आहे. मात्र उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही चार मोठी राज्ये अद्याप 50% सिंगल-डोस लसीकरण साध्य करू शकलेली नाहीत.

आरोग्यमंत्र्यांनी केले ट्वीट

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करुन ५० टक्के प्रौढ वर्गाचे लसीकरण पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे लक्ष्य साध्य करता आले. भारतातील नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत आणि त्यासाठी वेगाने काम करत आहोत, असंही ते म्हणाले.

कोरोनाची आकडेवारी

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी गुरुवारी पुन्हा अधोरेखित केले की, लस रोगाला थांबवू शकत नाही. पण रोगाची तीव्रता नक्कीचं कमी करू शकते. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारपर्यंत भारतात 44 हजार 658 नवीन रुग्ण आणि 496 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.