ITI विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ४० रुपयांऐवजी ५०० रुपये विद्यावेतन देणार

175

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री लोढा बोलत होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सन १९८२ पासून ४० रुपये आहे. यात वाढ करुन पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही विभागाच्या स्तरावर सुरू आहे. खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेश शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करून १०० टक्के प्रवेश होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात/ तालुक्यात मागणीनुसार एमआयडीसी आणि उद्योगपुरक अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. स्थानिक कुशल कामगार आणि आयटीआयमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी सभागृहात सांगितले.

आयटीआयचे नूतनीकरण करणार; बाराशे कोटींची तरतूद

राज्यात ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. या आयटीआयमध्ये सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण-प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी वर्ग (व्हर्चूअल क्लास रुम), ग्रंथालय, जीम अशा विविध सुविधा देण्यात येईल. येत्या सहा महिन्यात याबाबत अंमलबजावणी होईल, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.