महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड हे गुजरातच्या दमणला आले. तेथील ग्रुप फार्मा या रेमडीसीवीर इंजेक्शनची उत्पादन करणाऱ्या कंपनीशी चर्चा करून कंपनीने ५०,००० रेमडीसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
त्याकरता आवश्यक लागणारी परवानगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मागितली आहे, असेही दरेकर म्हणाले. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागला आहे. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकारने रेमडीसीवीरतयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा : बेडच्या कमतरतेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली… अर्थमंत्र्यांसोबत मंत्र्यांची बैठक!)
ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडीसीवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला लिखित अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडीसीवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दिली. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत झाली आहे. राज्य सरकारने आरोप, प्रत्यारोपाचा खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करून ‘महाराष्ट्र माझा, जिम्मेदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची’, या पद्धतीने महाराष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून भाजपा कोरोना रुग्णांची मदत करीत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राज्यात रेमडीसीवीर औषधांचा तुटवडा
राज्यात कोव्हिडमुळे भयाण परिस्थिती आहे, रेमडीसीवीर औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा होत चालला आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृत्यूदर कमी करणे तसेच सुविधा वाढवणे हे आव्हान राज्यासमोर आहे. कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. त्या संबंधी मुख्यमंत्री निर्णय घेतील. लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्राथमिकता असेल, असेही शिंदेंनी सांगितले.
पुण्यात पाच हजार रेमडीसीवीर इंजेक्शन येणार
दुसरीकडे, पुण्यात सोमवार 12 एप्रिल रोजी पाच हजार रेमडीसीवीर इंजेक्शन येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची रेमडीसीवीरची चिंता मिटणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात माहिती देत पुणेकरांना मोठा दिलासा दिला. रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. सध्या पुण्यात जवळपास 70 टक्के रेमडीसीवीर इंजेक्शनची कमतरता आहे. परंतु रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community