डोंबिवली एमआयडीसीत ५१ तासांचा शटडाऊन; पाण्यासाठी नागरिकांची तडफड

145

पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी रहिवाशांची तडफड सुरु असतानाच, एमआयडीसीने शुक्रवारी २४ तासांसाठी घेतलेले शटडाऊन तब्बल ५१ तास लांबल्याने, नागरिकांचे अतोनात हाल झाले. शटडाऊननंतर पाईप फुटी किंवा पाणी गळतीमुळे कायमच शटडाऊनचा कालावधी लांबत असून, एमआयडीसीचे नियोजन फसत असल्याने, त्रस्त नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चाची हाक दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसह एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केल्या जाणा-या परिसरात मेअखेरपर्यंत शटडाऊन सुरु करण्यात आले नाही, मात्र १५ दिवसांतून एकदा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. यानंतर अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु केला जात असल्याने, नागरिकांना पुढील २ दिवस पाण्याच्या त्रासात घालवावे लागतात.

गरिबांचे प्रचंड हाल होतात

ग्रामीण भागात तर पिण्यासाठी घोटभर पाणी मिळावे, म्हणून टँकरचाच आधार उरला आहे. टॅंकरच्या प्रतीक्षेत रांगा लावायच्या किंवा टॅंकर माफियाची मुजोरी सहन करत ३ ते साडेतीन हजारात १० हजार लिटरचा टॅंकर विकत घ्यायचा, हाच दिनक्रम ठरला आहे. गरिबांना विकतचे पाणी परवडत नसल्याने, त्याचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच एमआयडीसीने शुक्रवारी २७ मे रोजी २४ तासांकरिता एमआयडीसीसहित २७ गावे व इतर काही महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे, सांगितले होते. मात्र शनिवारी पाणीपुरवठा सुरु होताच, पाइपलाइन गळती चालू झाल्याने, त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील २५ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला.

( हेही वाचा: फडणवीसांनी आघाडीला फॉर्म्यूला सांगितला; म्हणाले, “आम्हाला घोडे बाजार करायचा…” )

एमआयडीसी कार्यालयात धडक देत जाब विचारावा

गुरुवारनंतर नागरिकांना थेट रविवारी दुपारी तीन वाजता पाणी मिळाले, मात्र तेही अतिशय कमी दाबाने. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, तर ग्रामीण भागातील पाण्यासाठी तडफडणारे गरीब नागरिक पाईप लाईनचे पाणी गळती सुरु असलेले व्हॉल्व्ह सैल करून त्याला पाईप लावून पिण्यासाठी हंडाभर पाणी मिळविण्याची कसरत करतात. एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे अनेक व्होल्व्हमधून पाणी गळती सुरु असताना, एमआयडीसीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर दुसरीकडे वारंवार अशा प्रकारे एमआयडीसीच्या शटडाऊनच्या फसणाऱ्या नियोजनामुळे नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने, त्रस्त नागरिक एमआयडीसी कार्यालयात धडक देत जाब विचारण्याचा निर्धार केल्याची माहिती डोंबिवली एमआयडीसी वेल्फेअर असोसीएशनचे राजू नलावडे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.