माटुंगा (Matunga) परिसरात आधीच चिंचोळे आणि अरुंद रस्ते आदींवर आधीच वाहने उभी केल्याने आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याच अनेक रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागांवर बेवारस भंगारवजा गाड्या उभ्या केल्या जात असल्याने येथील नागरिक त्रस्त असतानाच मंगळवारी महापालिकेच्यावतीने येथील सर्व अनधिकृत उभी केलेली वाहने तसेच विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस व निकामी वाहनांविरोधात धडक कारवाई हाती घेतली, यात तब्बल ५४ बेवारस वाहने उचलण्यात आली आहेत. तर, एकूण १५४ वाहनधारकांना त्यांची निकामी झालेली वाहने हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या भागात वाहनतळाची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे.
महापालिकच्या एफ उत्तर विभागातील माटुंग्यातील (Matunga) विविध रस्त्यांवर उभे करण्यात आलेल्या निकामी आणि बेवारस वाहनांमुळे वाहतुकीस तसेच पायी मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा निर्माण होतो. तसेच, या वाहनांचा अपप्रवृत्तींकडून दुरुपयोग होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने विविध ठिकाणी उभ्या असलेल्या बेवारस वाहनांबाबत नागरिकांकडूनही तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात माटुंगा (Matunga) परिसरातील विविध रस्त्यांवर पडलेली निकामी व बेवारस वाहने हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेतंर्गत माटुंगा (Matunga) परिसरातील बालकृष्ण सुळे मार्ग, रफी अहमद किडवई मार्ग, रावळी गनतरा मार्ग, शेख मिस्री दर्गा मार्ग, कोरबा मिठागर मार्ग, वडाळा अग्निशमन केंद्र मार्ग आणि अन्य मार्गांवरील बेवारस वाहने उचलण्यात आली. यामध्ये ५४ बेवारस वाहनांचा समावेश आहेत. कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर ३७ वाहने संबंधित वाहनधारकांनी स्वत:हून हटवली. तर, १७ वाहनांची प्रशासनाच्या वतीने विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, १५४ वाहनधारकांना त्यांची बेवारस वाहने हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. बेवारस व निकामी वाहने उचलण्यात आल्यामुळे आता विविध मार्गांवरील रहदारी सुरळीत होण्यास मदत झाली आहे. या कारणाने नागरिकांकडूनही याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचा Pakistan चे पोलीस, लष्कर, आयएसआयचे अधिकारी प्रवास करत असलेली जाफर एक्स्प्रेस केली हायजॅक)
माटुंगा भागातील अरुंद रस्त्यामुळे जुन्या इमारतीतील रहिवाशांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत असून रहिवाशांसह याठिकाणी येणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळ माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारी तब्बल ४८० वाहन क्षमतेचे रोबोटीक पार्किगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्किंगच्या बांधकामासाठी सर्वप्रकारच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात वाहनतळाचे काम सुरु होणार तोच आता हे बांधकाम होवू नये यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची रचना आणि तेथील वाहने उभी करण्यात येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे याठिकाणी माटुंगा येथील वाहनतळाची नितांत गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, आता महापालिका प्रशासनाने विरोधाला न जुमानता बांधकाम करणे आवश्यक असतानाच याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community