मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ५,५०४! निर्बंधाबाबत महापालिका, सरकार उदासीन!

मागील पाच दिवसांपासून दैनदिन रुग्णांची संख्या तीन हजारांवरुन साडेपाच हजारांवर जावून पोहोचलेली असतानाही मुंबई महापालिकेच्यावतीने अद्यापही कोणत्याही प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले नाही.

84

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. हा आकडा कमी होण्याच्या मार्गावर नाही. गुरुवार, २५ मार्च रोजी दिवसभरात मुंबईत तब्बल ५ हजार ५०४ रुग्ण आढळून आले. अशा रीतीने दररोज मुंबईत पाचशे ते दीड हजारांनी रुग्णा संख्येत वाढ होत आहे. तरीही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे अद्याप मुंबईत कडक निर्बंध लावण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्याबद्दल सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

३०,७६० रुग्णांवर उपचार सुरु! 

मुंबईत बुधवारी कोरोनाच्या रुग्ण संख्येत स्फोट होवून ५ हजार १८५ रुग्ण आढळून आले. त्यानंतर गुरुवारी ५ हजार ५०४ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात २ हजार ८८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ३० हजार ७६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेले सहाही रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ११ हजार ६०६ एवढी झाली आहे. लक्षणे नसलेल्या व सौम्य उपचार असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या सीसीसी टूमध्ये १,५५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर अधिक गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेले तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या १३ हजार ८३ रुग्णांवर डिसीएच, डिसीएचसी बेड आदी ठिकाणी उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा : सावधान! २६ मेपर्यंत राहणार कोरोनाची दुसरी लाट! )

…तरीही महापालिका आणि सरकार स्वस्थ!

मागील पाच दिवसांपासून तीन हजारांवरुन दैनदिन रुग्णांची संख्या साडेपाच हजारांवर जावून पोहोचलेली असतानाही मुंबई महापालिकेच्यावतीने अद्यापही कोणत्याही प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले नाही. महापालिका आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्याच्या सूचना केल्या जात नसून खुद्द राज्य सरकारही एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असतानाही मुंबईतील निर्बंधाच्या सुचना जारी करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबईत रुग्ण संख्या नियंत्रणात राहण्याऐवजी पुन्हा झपाट्याने वाढण्याची भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने नियमावलीचे काटेकोर पालन करणे गरजेचे!

एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून सामान्य जनतेला प्रवास करण्यासंदर्भातील जी नियमावली बनवली आहे. त्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे करून घेतल्यास रेल्वे लोकलमधील गर्दीवर नियंत्रण राहिल. परिणामी भविष्यात लोकलमधून याचा प्रसार होण्याची शक्यता कमी होईल, असे बोलले जात आहे. रेल्वे लोकलमधील ९० टक्के प्रवाशी मास्कचा वापर करत असले तरी त्यातील काही प्रवाशी हे नियमानुसार मास्क परिधान करत नाही. त्यामुळे परिणामी प्रसार होण्याचीही भीती जास्त असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.