चक्रीवादळामुळे मुंबईतील ५८० कोरोनाग्रस्त रुग्णांचे रात्रीच स्थलांतर!

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील भव्य कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण ५८० कोविडबाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी या रुग्ण स्थलांतर कार्यवाहीबाबत नियोजन व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, उपआयुक्त विश्वास शंकरवार, उपआयुक्त पराग मसूरकर, संचालक (प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये) डॉ. रमेश भारमल, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, संबंधित उपआयुक्त व इतर यंत्रणांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

(हेही वाचा : मुंबईत शनिवारी रुग्ण संख्या १,४४७, मृतांचाही आकडा ६२ वर!)

योग्य नियोजनासह स्थलांतराची कार्यवाही 

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे. प्रामुख्याने तीन भव्य (जंबो) कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये १५ मे रोजी रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करावयाची आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील २४३ आणि मुलुंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, प्राणवायू पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलिंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर सयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी दिले.

रुग्णालय निहाय समन्वय अधिकारी तात्काळ नेमण्याचे निर्देश

कोणता रुग्ण कोणत्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला, त्यासाठी रुग्णवाहिका व इतर आवश्यक वैद्यकीय संयंत्रे व सामुग्री उपलब्ध आहे का, यासह विविध तपशिलवार कार्यवाही करण्यासाठी रुग्णालय निहाय समन्वय अधिकारी तात्काळ नेमण्याचे निर्देशही काकाणी यांनी तिनही कोविड केंद्रांना दिले. रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवावी, ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, तसेच प्रत्यक्ष स्थलांतर सुरु करताना वाहतूक पोलिसांसमवेत आवश्यक तो समन्वय साधावा, अशी सूचनाही काकाणी यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here