उत्तर भारतात वाढती थंडी आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते. दाट धुके आणि कमी दृश्यमानतेचा मोठा परिणाम हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ५९ मेल-एक्सप्रेस आणि ७६ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तसेच ९५ रेल्वे गाड्यांना विलंब होण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. हवामानातील बदलांमुळे डिसेंबर २०२२ पासूनच रेल्वे गाड्यांना १.३० ते ४.३० तास विलंब होत असल्याची नोंद आहे. यामुळे प्रवाशांची बरीच दमछाक होत असल्याचे दिसते.
थंडीचा कहर
गेल्या पंधरवड्यापासून किमान तापमान सामान्य मर्यादेच्या खाली जात असताना, कमाल तापमानातही गेल्या आठवड्याभरात घट झाल्याचे दिसून येते. हवामान खात्याने पुढील २४ तासांत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पालम वेधशाळेने ५० मीटर दृश्यमानता नोंदवली. देशाच्या उत्तर भागात दिवसेंदिवस थंडी आणि धुके वाढत असल्यामुळे रेल्वे प्रमाणेच हवाई आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याचा अंदाज आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये थंडीची लाट अव्याहतपणे सुरु आहे, किमान तापमानही सामान्य मर्यादेच्या खाली नोंदवले गेले.