पर्यावरण विभागाच्या सुचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्वयाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२३ पासून कारवाईला सुरुवात झाली असून कारवाईच्या पाचव्या अर्थात २५ ऑगस्ट रोजी १०९९ दुकानांना भेटी देऊन त्यांच्याकडून १०७ किलोचे प्लास्टिक जप्त केले. त्यामुळे आतापर्यंत पाच दिवसांमध्ये सुमारे पाच हजार दुकानांना भेटी देत तब्बल ५९३ किलोचे प्लास्टिक जप्त केले आणि या पाच दिवसांमध्ये १३ लाख ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आता पर्यावरण विभागाच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्वयाने महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार आहे. त्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावरील कर्मचा-यांचाही समावेश आहे. तसेच कार्यवाही दरम्यान पोलीस दलातील एक कर्मचारीही समाविष्ट आहेत. या पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तूवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होणार आहे.
प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेता, १ जुलै २०२२ पासून महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी सुरूवात केली आहे. यामध्ये पाचव्या दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी १०९९ दुकानांना भेटी देत त्यातील ५१ जणांविरोधात पहिला गुन्हा नोंदवला आहे. तर या कारवाईत १०७ किलोचे प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यासर्वांकडून २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यामुळे मागील पाच दिवसांमध्ये एकूण ६०१८ दुकानांना भेटी दिल्या असून त्यामध्ये एकूण ५९३ प्लास्टिक जप्त करून त्यांच्याकडून एकूण १३ लाख ४० हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पाच दिवसांमध्ये एकूण २६८ जणांविरोधात प्रथम गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर १ जुलै २०२२ पासून ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७९१ दुकानांना भेटी देत त्यांच्याकडून एकूण ५९९० किलोचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. आणि या कारवाईत एकूण ९६लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करत यातील १९२३ जणांविरोधात प्रथम गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दोन जणांविरोधात दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community