गोवरमुळे सहा महिन्यांच्या चिमुकलीचा बळी

मुंबईत गोवरचे संशयित मृत्यू वाढत असताना भिवंडी येथे राहणा-या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा गोवरमुळे मृत्यू झाला. सकीना अन्सारी असे मृत पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे. सकीनाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.  मुंबईत आतापर्यंत गोवरबाधित रुग्णांच्या संशयास्पद मृत्यूची आकडेवारी ८पर्यंत पोहोचली आहे.

सकीनाचे कुटुंबीय अगोदर गोवंडी येथे राहत असल्याचे बोलले जात आहे. गोवंडीतून अन्सारी कुटुंबीय भिवंडीत राहायला गेले. सकीनाला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी साडेसहा वाजता सकीनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालिका अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली भिवंडीची रहिवासी असल्याने भिवंडीतील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेसाठी कळवले जात असल्याचेही सांगण्यात आले. मृत्यू अहवाल समितीच्या अहवालानंतर मृत्यूच्या आकडेवारीबाबत निश्चितता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

गोवरच्या रुग्णांची संख्या १६९ वर 

मुंबईतील गोवरबाधितांची संख्या आता १६९पर्यंत नोंदवली गेली आहे. ४ नोव्हेंबरपासून ३८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज करण्यात आले.

( हेही वाचा: नायरमधील शिकाऊ परिचारिकांना ६५ रुपयांमध्ये नाश्त्यासह दोन वेळचे जेवण )

२ ते ५ वर्षांच्या मुले शोधण्याचे दिव्य

गोवंडीत मोठ्या प्रमाणात गोवरची बाधा होण्यामागे शून्य लसीकरण मोहिम कारणीभूत असल्याचे घरोघरी सुरु झालेल्या सर्व्हेक्षणातून उघडकीस आल्यानंतर आता पालिकेने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. २ ते ५ वयोगटातील मुलांचा शोध घेतला जाईल. मात्र आरोग्यसेविकांच्या दाव्यानुसार जन्मतः मिळणा-या मूलभूत लसीदेखील या भागांतील नवजात शिशूंपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यासाठी विभागनिहाय आरोग्य अधिका-यांच्या मार्गदर्शनातून होणा-या लसीकरण मोहिमेला जबाबदार धरणे योग्य राहील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here