मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसाठी १० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे. येत्या ३ डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेला १ लाख फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घ्यायचे टार्गेट ठेवले असले तरी भविष्यात हे टार्गेट येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, ७ डिसेंबर पर्यंत मुंबईतील ६० हजार ३५० फेरीवाल्यांचे अर्ज भरून घेत कर्जासाठी महापालिकेने त्यांना शिफारस पत्र दिले आहे.
( हेही वाचा : पाच दिवस सूत गिरणीत सांबरची विश्रांती, वनविभागाने क्लुप्ती लढवली)
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेतंर्गत पथ विक्रेत्यांसाठी सुक्ष्म पुरवठा म्हणून दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्राची ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवली जात आहे. या फेरीवाल्यांच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता केंद्राने महापालिकेला ही योजना पुन्हा युध्द पातळीवर राबवण्याचे निर्देश दिल्यानंतर ३ डिसेंबर २०२२ पर्यंत १ लाख फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घेत त्यांना या निधीचा लाभ मिळवून देण्याचे टार्गेट दिले होते. बँकांकडून फेरीवाल्यांचे नाकारले जाणारे अर्ज पाहता बँकांच्या नियमांमध्ये शिथिलता आणत मुंबईतील २४ विभाग कार्यालयांमध्ये अर्ज भरुन घेण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. परंतु ३ डिसेंबरचे टार्गेट न मानता ही मोहिम पुढेही कायम ठेवत १ लाख फेरीवाल्यांचे अर्ज भरून देत त्यांना पंतप्रधान स्वनिधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
७ डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण ६० हजार ३५० अर्ज भरून घेत फेरीवाल्यांना महापालिकेने शिफारस पत्र दिले आहे. आतापर्यंत ९ हजार २३२ फेरीवाल्यांना कर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे, तर २९ हजार ४२४ फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे सर्व फेरीवाल्यांचे मंजूर अर्जांवर महापालिकेने बँकांना दिलेल्या शिफारस पत्रानुसार त्यांचे कर्ज मंजूर केले जाणार असून बँकांनी मंजूर केलेल्या सर्व कर्जांची रक्कम एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल,अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
Join Our WhatsApp Community