मुंबईमध्ये वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे तसेच बहुतांशी रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्येच जाण्यासाठी इच्छुक आहेत. सौम्य स्वरुपाच्या सहव्याधी असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत यासाठी महापालिकेच्यावतीने ६२ नर्सिंग होम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व नर्सिंग होम टप्प्याटप्प्याने पुढील आठवड्यापर्यंत सुरू केले जाणार आहेत. या नर्सिंग होममुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना काही प्रमाणात त्रास जाणवू लागल्यास, अशा नर्सिंग होममध्ये दाखल करुन घेतले जाईल. ज्याद्वारे रुग्णांची आयसीयू तसेच ऑक्सिजन बेडची गरजही पूर्ण होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची मागणी
मुंबईत मागील काही दिवसांपासून सरासरी दहा हजार रुग्ण दररोज आढळून येत आहेत. या वाढत्या रुग्णांमुळे भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. रुग्ण संख्या अधिक असली तरी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल, अशा गंभीर स्वरुपाचे रुग्ण नसल्याने ९० ते ९५ टक्के रुग्ण हे घरीच विलगीकरण(आयसोलेशन) होत उपचार घेत आहेत. १३ हजार रुग्णशय्यांची संख्या असूनही त्याचा ताण पडत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात तसेच कोरोना काळजी केंद्रांमध्ये रुग्ण खाटा रिकाम्याच आहेत. जास्तीत जास्त रुग्णांकडून खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा प्रकट केली जात आहे. त्यामुळे काही मोजक्याच खाजगी रुग्णालयांचा हट्ट रुग्णांकडून धरला जात असल्याने, काही स्वरुपात मोजक्याच रुग्णालयांमध्ये खाटांची चणचण भासू लागली आहे. मात्र, यामध्ये ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडची मागणी असल्यामुळे, मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सुमारे ६२ नर्सिंग होम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
(हेही वाचाः कोरोना चाचण्यांसाठी काय आहे नवी नियमावली?)
असा होईल फायदा
या नर्सिंग होममधील रुग्ण खाटा उपलब्ध झाल्यास सध्याच्या १३ हजारच्या तुलनेत २५ हजार एवढी एकूण रुग्णखाटांची संख्या पोहोचणार आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सर्व नर्सिंग होमसोबत करार करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यापर्यंत ते सुरू होतील, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. नर्सिंग होम ताब्यात घेण्यामागचा उद्देश हा बाधित रुग्णाला सौम्य प्रकारचा सहव्याधी आजार असेल, त्यांनी मोठ्या रुग्णालयात न जाता अशा नर्सिंग होममध्ये जाऊन उपचार घ्यावेत. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये मोठ्या स्वरुपाच्या आजारांच्या आणि गंभीर रुग्णांनाच दाखल करता येईल. जेणेकरुन गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार वेळीच होईल आणि सौम्य आजाराच्या रुग्णाला वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा आजार नियंत्रणात येईल. त्यांची प्रकृती गंभीर होणार नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community