मुंबईत सुमारे ६२ हजार बाधित रुग्ण, पण गंभीर रुग्ण १ हजार!

६२ हजार रुग्णांपैकी केवळ गंभीर स्वरुपाच्या रुग्णांची संख्या ही १ हजार ५५ एवढीच असल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

95

मुंबईत दरदिवशी सापडणा-या रुग्णांची संख्या ११ हजारांवर पोहोचलेली असून, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या ६२ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण उपचार सुरू असलेल्या या रुग्णांपैकी केवळ १ हजार ५५ रुग्णांचीच प्रकृती गंभीर आहे. तर ११ हजार रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणे असून, सुमारे ५० हजार रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे बहुतांशी रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अधिक भीती आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी अधिक घाबरुन जाण्याचे कारण नसून, प्रत्येकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

१ हजार ५५ गंभीर रुग्ण

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्य झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. १ मार्च रोजी ९ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू होते. पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या मुंबईत ६२ हजार १८७ रुग्णांवर विविध ठिकाणच्या केंद्रांमध्ये तसेच कोविड रुग्णालयांसह घरी राहूनही उपचार केले जात आहेत. रविवारी आढळून आलेल्या रुग्णांचा आकडा ११ हजार पार झाला. पण तोपर्यंत उपचार घेत असलेल्या ६२ हजार १८७ रुग्णांपैकी ४९ हजार ९०२ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. त्यामुळे लक्षणे नसलेले रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत. आपल्या फॅमिली फिजिशियन तसेच महापालिकेच्या संपर्कात राहून या आजाराबाबतचे उपचार घेताना स्वत:ची काळजीही घेत आहेत. तर या सर्व रुग्णांपैकी ११ हजार २३० रुग्णांमध्येच लक्षणे असून, यापैकी केवळ १ हजार ५५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे ६२ हजार रुग्णांपैकी केवळ गंभीर स्वरुपाच्या रुग्णांची संख्या ही १ हजार ५५ एवढीच असल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. ८२ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याने रुग्णांना आपल्या घरी राहूनच उपचार घेता येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोविडची बाधा झाली तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून केले जात आहे.

(हेही वाचाः स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा जाधव ‘यशवंत’!)

संपूर्ण मुंबईत ५ लाख ३५ हजार क्वारंटाईन

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर लक्षणे नसलेले रुग्णांवर घरीच उपचार होत आहेत. तरीही त्यांच्या अती निकटच्या संपर्कातील लोकांना होम क्वारंटाईन केले जात आहे. १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये बदल करत १७ दिवसांचा करण्यात आला. त्यामुळे आजमितिस म्हणजे रविवार सकाळपर्यंत संपूर्ण मुंबईत एकूण ५ लाख ३५ हजार १११ होम क्वारंटाईन आहेत. तर आतापर्यंत होम क्वारंटाईन झालेल्या एकूण बाधित रुग्णांसहित संशयित रुग्णांची संख्या ही ४९ लाख ०७ हजार ४१४ एवढी झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत दिवसभरात एकूण ४३ हजार ६५० संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.