नायरमधील शिकाऊ परिचारिकांना ६५ रुपयांमध्ये नाश्त्यासह दोन वेळचे जेवण

महापालिकेच्या  नायर रुगालयातील निवासी शिकाऊ परिचारिकांना (नर्सेस) दैनंदिन नाश्ता व दोन वेळचे जेवण हे अवघ्या ६५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या या नर्सेसना हे जेवण व नाश्ता ९० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जात होते. परंतु आता जेवण व नाश्ताकरता ६५ रुपयांचा दर निश्चित करून कंत्राट मिळवल्याने यापूर्वीच्या कॅटरर्स कंपनीच्या माध्यमातून महापालिकेची तिजोरी लुटली जात होती, असा समज निर्माण होतो. तसेच अवघ्या ६५ रुपयांमध्ये नाश्ता आणि दोन वेळचे जेवण दिले जात असले तरी या शिकाऊ नर्सेसना पोटभर आणि पोषक अन्न असेल का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

२८७ निवासी परिचारिकांना जेवण व नाश्ताची सुविधा पुरवली जाईल

महापालिकेच्या नायर रुग्णालयात निवासी परिचारिक विद्यालय चालविण्यात येते. या विद्यार्थी परिचारिका निवासी असल्यामुळे त्यासाठीच्या दररोजच्या भोजनाची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. यापूर्वी शिकाऊ नर्सेसना दैनंदिन नाश्ता आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचा कालावधी फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली. यामध्ये तीन वर्षांकरता  नेमण्यात आलेल्या व्ही.एन. कॅटरर्स  या कंत्राटदाराने नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण आणि पेयांकरता प्रति दिन ६५ रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. १०९५ दिवसांकरता नेमण्यात आलेल्या या कंपनीने कालावधीकरता सुमारे २८७ निवासी परिचारिकांना जेवण व नाश्ताची सुविधा पुरवली जाईल. तर या  रुग्णालयातील ८०० अनिवासी परिचारिकांना ९ रुपये ४० पैशांमध्ये चहा पुरवला जाईल. विशेष म्हणजे यापूर्वी सहा रुपयांमध्ये चहा पुरवली जात होती, त्याचा दर ३ रुपये ४० पैशांनी वाढवला गेला. त्यामुळे  २८७ निवासी परिचारिकांसह  ८०० अनिवासी परिचारिकांना चहाची सुविधा देण्यासाठी  पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

६५ रुपयांमध्ये नाश्ता आणि जेवण कसे दिले जाणार?

या निविदेमध्ये भाग घेणाऱ्या ए.ए.एम. चेरुवत्तम या कंपनीने निवासी परिचारिकांना दरडोई नाश्ता आणि जेवणाकरता ९७ रुपये ४४ रुपये एवढा दर आकारला होता. तर अनिवासी परिचारिकांना चहाचा पुरवठा करण्यासाठी सुमारे ७ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे चहाच्या प्रत्येक कपामागे तीन रुपये कमवून निवासी परिचारिकांच्या जेवण व नाश्ताचा दर कमी करण्याचा प्रयत्न केला असावा असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ए.ए.एम.चेरुवत्तम ही कंपनी महापालिकेच्या उपहारगृहाला भाजी व कडधान्ये व इतर वस्तूंचा पुरवठा करते. त्यामुळे व्ही.एन. कॅटरर्स या कंपनीला मदत करण्यासाठी ए.ए. एम. चेरुवत्तम या कंपनीने निविदेत भाग घेऊन मदत केली होती का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे यापूर्वी ९० रुपयांमध्ये मिळणारा नाश्ता आणि जेवण अवघ्या ६५ रुपयांमध्ये कसे दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here