मध्य रेल्वेवर एका महिन्यात तिस-यांदा जम्बो मेगाब्लाॅक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक घेतला जाणार आहे. शनिवार ते सोमवार यादरम्यान हा ब्लाॅक असल्याने, नोकरदार वर्गाला तसेच माघी गणपतीसाठी गावी जाणा-या कोकणवासीयांना या ब्लाॅकचा फटका बसणार आहे.
कोकणात जाणा-या सर्व गाड्या रद्द
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पाच्या अंतिम कामासाठी 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा ब्लाॅक घेतला जाणार आहे. त्यानंतर पाचवी आणि सहावी या दोन्ही मार्गिका रेल्वे प्रवासास खुल्या होतील. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या मेगा ब्लॉकदरम्यान धावणार नाहीत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6 व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याकाळात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
या एक्सप्रेस बंद
- कोकणात जाणाऱ्या तेजस, जनशताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत.
- याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
- त्यासोबतच दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या मेमु ट्रेनदेखील या काळात बंद राहणार आहेत. तर सर्व फास्ट गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
( हेही वाचा: ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांविषयीच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी )
या आधीही घेण्यात आले जम्बो मेगाब्लाॅक
ठाणे-दिवा ५ व्या आणि ६व्या मार्गिकेच्या संबंधात नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान, अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा ब्लॉक 8 जानेवारीला घेण्यात आला होता. तसेच, याच मार्गिकेच्या कामांसाठी 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान, 24 तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community