कोरोनापासून पूर्ण संरक्षण तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही कोरोनाप्रतिबंधात्मक लसीचे २ डोस घेतलेले असतील, असा जगतमान्य नियम आहे. पण जगापेक्षा आम्ही हुशार, अशा अविर्भावात राहून लसीच्या दुसऱ्या मात्रेकडे खुशाल दुर्लक्ष करणारे महाभाग काही कमी संख्येने नाहीत. असे एकूण ७५ लाख जण महाराष्ट्रात बिनधास्त फिरत आहेत. अशांना पकडून त्यांना लसीचा दुसरा डोस देण्याचे आव्हान राज्य सरकारच्या पुढे आहे.
केवळ ३२ टक्के ‘लसवंत’
राज्यातील आतापर्यंत एकूण लसीकरण हे ९ कोटी ७२ लाख इतके झाले आहे. पण त्यापैकी दुसरा डोस घेऊन लसवंत झालेले अवघे ३२ टक्के इतकेच आहेत. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचा आनंदही राज्याला घेता येत नाही, ही संख्या सुमारे ७५ लाख इतकी आहे. या लोकांच्या दुसऱ्या डोसची मुदत उलटून गेली तरी ही मंडळी काही लसीकरण केंद्रात फिरकली नाहीत. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण २५ टक्क्याहूनही कमी आहे.
(हेही वाचा : विदेशातील नातलगांची दिवाळी फराळाविनाच! पाकिटे तयार, पण…)
५६ लाखांहून अधिक मात्र पडून!
पहिल्या मात्रेचे सर्वाधिक ९८ टक्के लसीकरण मुंबईत, तर त्या खालोखाल ९३ टक्के पुणे, ९१ टक्के भंडारा आणि सिंधुदुर्गमध्ये ८८ टक्के लसीकरण झाले आहे. दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्यांमध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून ५८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यानंतर पुण्यात ५० टक्के, भंडाऱ्यात ४५ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ४७ टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. राज्यात सध्या कोविशिल्डच्या लशीचे सुमारे ६० लाख, तर कोव्हॅक्सिन लशीचे सुमारे १५ लाख अशा एकूण ७५ लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ होऊन गेली तरीही लस घेतलेली नाही. सध्या राज्यात सुमारे ५६ लाखांहून अधिक लशींचा साठा शिल्लक आहे. परंतु नागरिक दुसरी मात्रा घेण्यासाठी येत नसल्यामुळे त्यांचे लसीकरण कसे पूर्ण करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये लशीबाबत गैरसमज असून ते दूर करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. आजाराची तीव्रता अधिक असली की भीतीने नागरिक लसीकरणासाठी येतात, परंतु तीव्रता कमी झाल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण कमी होते, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
Join Our WhatsApp Community