डोंबिवलीत ७५वा ‘आर्मी डे’ धुमधडाक्यात साजरा होणार, भव्य बाईक रॅलीसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

137

दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस आर्मी डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीत उद्या रविवार १५ जानेवारी रोजी आर्मी डे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने डोंबिवलीमध्ये भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली असून सायंकाळी स्काऊट आणि एनसीसी कॅडेट परेड होणार आहे. के. वि. पेंढरकर महाविद्यालयाचे एनसीसी आणि बँड पथक, ओमकार शाळेचे स्काऊट आणि बँड पथक परेडसह मानवंदना देणार आहेत. देशाचे माजी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून लेफ्टनंट कुलकर्णी यांचे सियाचेन युद्धभूमीच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित “सियाचेन काल आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

डोंबिवलीत आर्मी डेनिमित्ताने कसा असणार कार्यक्रम?

१५ जानेवारी १९४९ रोजी फिल्ड मार्शल लेफ्टनंट जनरल के एम करिअप्पा यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारताचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून भारतीय सैन्याचा पदभार स्वीकारला. दरवर्षी हा दिवस आपण आर्मी डे म्हणून साजरा करतो. याच दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीत ७५वा आर्मी दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

शहरात आर्मी डे साजरा करण्यासाठी युवकांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून संध्याकाळी ५ वाजता डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील शहीद विनयकुमार सच्चान स्मारक ते आप्पा दातार चौक, फडके रोड येथे कार्यक्रम स्थळी बाईक रॅलीद्वारे पाहुण्यांना नेण्यात येणार आहे. रॅलीचा मार्ग घरडा सर्कल – शेलार चौक – टिळक पुतळा – चार रस्ता – इंदिरा गांधी चौक – बाजी प्रभू चौक – मदन ठाकरे चौक असा असून फडके रोड येथे रॅली समाप्त होईल.

सायंकाळी ५.३० वाजता मदन ठाकरे चौक, फडके रोड येथे पेंढरकर कॉलेज आणि ओमकार शाळेच्या विद्यार्थ्यांची परेड आणि एनसीसी बँड डोंबिवलीकरांना पाहायला मिळेल. आप्पा दातार चौक येथे पेंढरकर महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्स तर्फे लेफ्टनंट जनरल कुलकर्णी सरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि विविसू डेहरा संस्था, डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ, ओमकार एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आर्मी डे धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारे छायाचित्र प्रदर्शन भरणार

सियाचेन युद्धभूमीच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित “सियाचेन काल आज आणि उद्या” या विषयावर लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी बोलणार आहेत. फडके रोड डोंबिवली पूर्व येथे सायंकाळी सहा वाजता हा आर्मी डे साजरा होणार आहे. विविसु डेहरा संस्था, विवेक वडगबाळकर व ग्रुपतर्फे देशभक्तीपर गीतांचा परमवीर शौर्य सलाम या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारीला डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारे छायाचित्र प्रदर्शन भरणार आहे. आर्मी डे कार्यक्रमाला डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ, ओमकार एज्युकेशनल ट्रस्ट, विविसु डेहरा संस्था आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

(हेही वाचा – राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.