7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; सरकारी कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

96

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील विद्यमान वेतनश्रेणी व ग्रेड पे संरक्षित करुन त्याप्रमाणे सुधारित वेतन निश्चित करण्याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद करीत मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त केले आहेत.

( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार? )

सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या काही पदांच्या वेतनश्रेणी या शासनाकडे असलेल्या वेतनश्रेणीशी समकक्ष आढळून न आल्याने या पदांबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. परंतु अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याबाबत कमर्चारी सातत्याने माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तक्रार करीत होते. कोणत्याही संवर्गाचे वेतन कमी न करता कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीचा फेरविचार करण्याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी महापौर म्हस्के यांनी केला होता.

परंतु वर्ग 1 ते 4 मधील प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत निर्णय होण्यास विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत नव्हता. याबाबत माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे कर्मचाऱ्यांची मागणी लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासननिर्णय सोमवार १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, नजीब मुल्ला, सर्व माजी पदाधिकारी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.