मुंबईत वर्षभरात ८१५ नवीन विहिरींची भर

मागील वर्षभरामध्ये मुंबईमध्ये ८१५ नवीन कुपनलिका आणि रिंग विहिरींची भर पडल्याचे आरोग्य विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागांच्या प्राप्त आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.

144

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मुबलक पाणी साठा जमा झाल्याने पुढील वर्षभर तरी पाण्याची चिंता नाही. मात्र, महापालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कमी वापर व्हावा म्हणून प्रत्येक मोठ्या इमारत बांधकामांमध्ये वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टींग)करता कुपनलिका (विंधण विहिर)आणि कंगण (रिंग वेल) विहिर आदी खोदण्यास महापालिकेच्या माध्यमातून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे मागील वर्षभरामध्ये मुंबईमध्ये ८१५ नवीन कुपनलिका आणि रिंग विहिरींची भर पडल्याचे आरोग्य विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागांच्या प्राप्त आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.

( हेही वाचा : मुंबईतील पुतळे गुले कुठे? )

मुंबईत पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पाण्याचा वापर हा विहिरींच्या माध्यमातून केला जात असून सन २०१०मध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यानंतर मुंबईतील विहिरींच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यास तसेच अस्तित्वातील विहिरींची दुरुस्ती व साफसफाई करून त्यांतील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग अंतर्गत पाणी जमिनी जिरवून त्यातील पाण्याचा वापर कुपनलिका आणि रिंगवेलच्या माध्यमातून करण्यास झाली आहे. मात्र, ५ फुटापेक्षा मोठ्या व्यासाच्या नवीन खोदीव विहिरी खोदण्यासाठी परवानगी दिली जात नाही. विद्यमान खोदीव विहिरीबाबत जुन्या विहिरीला आरसीसी स्लॅबसह, खोदीव विहिरीचे सिमेंट कॉंक्रीट (HCC) विहिरीमध्ये रुपांतरण करून यातील पाणी पिण्याकरता न करता अन्य वापराकरता वापरण्यास परवानगी देण्यात येते.

आकडेवारी काय दर्शवते बघा

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य आणि इमारत प्रस्ताव विभागाकडील आकडेवारीनुसार मागील वर्षी म्हणजे सन २०२०-२१मध्ये मुंबईमध्ये एकूण १८ हजार ९६ विहिरींची संख्या होती, तर सन २०२१-२२मध्ये ही संख्या १८ हजार ९११ एवढी असून एका वर्षांमध्ये ८१५ विहिरींची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. खोदीव विहिरींची संख्येत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसून मागील वर्षी प्रमाणेच म्हणजेच ४,६३८ एवढी आहे. तर मागील वर्षी कुपनलिकांची संख्या ११ हजार ८०५ होती, ती आता १२ हजार ५६१ एवढी झाली आहे. तर रिंग वेलची संख्या १६५३ होती ती आता १७१२ एवढी झाली आहे. त्यामुळे कुपनलिकांमध्ये ७५६ एवढी तर रिंग वेलमध्ये ५९ एवढी वाढ झाल्याचे आकडेवारींवरून पहायला मिळत आहे.

विहिर बुजवल्यास एमआरटीपीअंतर्गत होऊ शकते कारवाई

जानेवारी २००३ पासून मुंबई महागनरपालिकेने अस्तित्वात असलेल्या विहिरी बुजविण्यास मनाई केली आहे. अनिधिकृतपणे बुजविलेल्या विहिरींच्या बाबतीत सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाने) सहाय्यक अभियंता (इमारत व प्रस्ताव) यांना एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. नवीन विंधन (बोअर वेल) व कंगण विहिरी ( रिंग वेल) या ०५ फूट व्यासापर्यंत) खोदण्यासाठी आणि विहिरीचे पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर दुय्यम वापरासाठी परवानगी महापालिकेच्यावतीने दिली जाते.

तर विहिरी ठरु शकतात डासांचे अड्डे, म्हणून किटक नाशक विभाग घेतो काळजी

मलेरियाच्या प्रसारासाठी कारणीभूत असण ‘डास ‘अॅनाफीलीस स्टिफन्सी’ विहिरीच्या पाण्यात पैदास करण्यास प्राधान्य देतो आणि त्यामुळे आरोग्य विभागाच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून या विहिरींमध्ये औषध फवारणी सातत्याने करण्यात येते. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करायची असेल तर शहरातील विहिरी संरक्षित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. किटकनाशक अधिकाऱ्यांच्या मदतीने वर्षा संचयन व विनियोग कक्षाने मुंबईतील खोदीव व विधण विहिरींची यादी बनविली आहे. विहिरींचे उपलब्ध भूगर्भ माहितीच्या आधारे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सन २०२१-२२ : एकूण विहिरी १८, ९११ (४६३८ खोदीव, १२,५६१विंधन १७१२ कंगण )
सन २०२०-२१ : एकूण विहिरी १८,०९६ (४६३८खोदीव, ११,८०५विंधन, १८५३ कंगण)

प्रति विहिर/प्रति दिन २० हजारलिटर पाणी उपसा (अंदाजे 2 टँकर प्रति विहिरी) एवढा पाण्याचा उपसा गृहीत धरला तर ३५९ दशलक्ष लीटर प्रति दिन एवढा भूजलसाठा उपलब्ध होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.