मुंबईमध्ये अत्याधुनिक बस स्थानके तयार करण्यात येत असतानाच आता वरळी, लोअर परळ भागांमध्ये हरित बस स्थानके तयार करण्यात येणार आहे. यापैकी ४ बस स्थानकांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून ही बस स्थानके मुंबईतील पहिली हरित स्थानके ठरणार आहेत.
महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील विविध ठिकाणी नाविन्यपूर्ण असे हरित बस स्थानक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागातील हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीकोनातून या बस स्थानकांची उभारणी केली जात असून यामध्ये ४ बस स्थानकावर सोलर पॅनल बसण्यात येणार आहे. एकूण ८ बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. यासाठी सुमार ५८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून या कामाकरता विर्गो स्पेशाल्टिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा पुणेनंतर आता डोंबिवलीत कोयता गँगची दहशत; घरात घुसून ज्येष्ठ नागरिकांना धमकावले)
या हरित बसस्थानकाच्या उभारणीसाठी अथर्व हेल्थ टेक इंडिया ही कंपनी पात्र ठरली होती, परंतु या कंपनीने अनामत रक्कम न भरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी असलेल्या विर्गो स्पेशालिटी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यातील दोन बस स्थानके ही सेनापती बापट मार्गावर बसवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या बस स्थानकांच्या उभारणीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. या बस स्थानकांच्या निर्मितीसाठी बेस्ट प्रशासन ज्या प्रकारे सहकार्य करेल त्याप्रकारे या बस स्थानकांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community