मुंबई-नागपूर प्रवास सुलभ व्हावा तसेच अल्पावधीत लांबचा पल्ला गाठण्यासाठी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरु करण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते या महामार्गाच्या उद्धाटन होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या अल्प काळात समृद्धी महामार्गावर तब्बल ९०० अपघात झाले आहेत. यात ३१ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या महामार्गावर दररोज सरासरी ९ अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ६ खंड, ४० देश…नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार ‘भारत की बेटी’! पंतप्रधान म्हणाले… )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. हा महामार्ग सुरु होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महामार्गावर छोटे मोठे ९०० अपघात झाले आहेत. धक्कदायक बाब म्हणजे ४६ टक्के अपघात हे ब्रेक डाऊन झाल्यामुळे घडले आहेत. १५ टक्के अपघात टायर पंक्चरमुळे तर १२ टक्के अपघात टायर फुटल्यामुळे झाले आहेत. समृद्धीवर महामार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु, हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे.
इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्याने सुद्धा अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वारांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असताना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करताना पहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याच्या सुद्धा तक्रारी सुद्धा करण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community