मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या (शिवाजीपार्क) दैनंदिन देखभाल, दुरुस्तीसाठी अखेर कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या मैदानावर हिरवे गवत उगवून त्यावरील हिरवळ कायम राखत, शिवाजीपार्क धुळमुक्त करण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत कपूर ट्रेडिंग ही कंपनी पात्र ठरली. त्यामुळे आता शिवाजी पार्कचे गवत राखण्यासाठी १२ माळी झटताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या निविदेत दोनच कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यातील कपूर ट्रेडिंग कंपनीने अंदाजित दराच्या उणे २१ टक्के डी.बी इन्फ्राटेक या कंपनीने अधिक ३० टक्के दर आकारला. त्यामुळे निविदेतील सहभागी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मैदान धुळमुक्त केले जाणार
छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाचा आता कायापालट होत आहे. शिवाजी महाराज पार्क मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त असून, त्यांना दिलासा देण्यासाठी मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धुळमुक्त करण्यात येत आहे. या मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गवताळ भाग तयार करण्यात आल्याने, येत्या एप्रिल आणि मेपर्यंत संपूर्ण शिवाजीपार्क परिसरातील गवत चांगल्याप्रकारे वाढले जाणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे नव्याने होणारी हिरवळ व माती टिकून राहावी, संपूर्ण परिसराची स्वच्छता योग्य प्रकारे व्हावी, नव्याने दुरुस्त करून बसवण्यात आलेली तुषार सिंचन प्रणाली सतत कार्यान्वीत राहावी व नागरिकांच्या इतर कोणत्याही प्रकारच्या मैदानासंबंधीच्या समस्या तत्काळ सोडवता याव्यात, याकरिता छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे परिरक्षण व साफसफाई करण्यासाठीचे तीन वर्षांचे कंत्राट कामासाठी निविदा मागवली होती. तीन वर्षांसाठी तीन कोटी रुपयांच्या या अंदाजित रकमेच्या निविदेत कपूर ट्रेडिंग ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने तीन वर्षांकरता सुमारे अडीच कोटी रुपयांमध्ये कंत्राट मिळवले आहे.
शिवाजीपार्कच्या देखभालीसाठी पहिल्यांदाच कंत्राटदाराची नेमणूक
छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पुर्वी असमतल असल्यामुळे तिथे धुळीमुळे प्रदुषण होत असे व स्थानिक रहिवाश्यांना फुप्फुसांच्या आजारांचा सामना करावा लागत असे. तसेच पावसाळ्यात मैदानातील खाचखळग्यांमध्ये पाणी साचते व खेळाडूंना विविध खेळ खेळण्यास अडथळा निर्माण होत होता. याकरीता, छत्रपती शिवाजी महाराज मैदान समतल करून मैदानामध्ये मातीचा भराव टाकून त्यावर हिरवळ तयार करून धुळीचे प्रदूषण कमी करणे तसेच पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्पाचे इत्यादी सर्व काम महापलिकेमार्फत पुर्णत्वास आले असल्याचे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. शिवाजीपार्कच्या देखभालीसाठी कधीही कंत्राटदाराची नेमणूक केली जात नव्हती. आजवर संबंधित क्लबच्या माध्यमातून त्या परिसराची देखभाल केली जायची. परंतु आता या मैदानावर हरित पट्टा निर्माण केल्याने त्यांची निगा राखणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, प्रशासकांच्या मंजुरीनंतर येत्या १ जूनपासून या कामाला सुरुवात होणार आहे.
यामध्ये १२ माळी आणि १२ सफाई कामगारांचा समावेश असेल. शिवाय कोणतेही कार्यक्रम तसेच मेळाव्या दरम्यान मैदानांवर खड्डे निर्माण झाल्यास ते बुजवून मैदानाचा भाग समतल करण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदाराकडून केला जाणार आहे. या कंत्राटात मैदानाला पाणी मारणे, पंप सुरु करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखण्यासह विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर असेल. ज्याद्वारे शिवाजीपार्क मैदानाची योगयप्रकारे देखभाल होईल आणि हिरवळ कायम राखण्यात मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची ८ वर्षे आणि ५० निर्णय! )
शिवाजीपार्क मैदानांचा वापर टक्केवारीमध्ये:
एकूण शिवाजीपार्क मैदानाचे क्षेत्रफळ : १ लाख चौरस मीटर
पदपथाचे क्षेत्रफळ : १० टक्के
स्पोर्टस क्लबचे क्षेत्रफळ : २० टक्के
क्रिकेटच्या खेळपट्टी : २५ टक्के
फुटबॉल खेळपट्टी : ५ टक्के
जॉगिंग आणि सायकल ट्रॅक : ६ टक्के
इतर नवीन खेळ : ३ टक्के
उर्वरीत खेळाची मोकळी जागा : ३१ टक्के
एकूण ८ क्रिकेटच्या खेळपट्टया : १५०० चौरस मीटर
Join Our WhatsApp Community