पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत अग्नितांडव, १८ जण जाळून खाक! 

या आगीत १६ महिला जाळून खाक झाल्या आहेत, या मृतदेहांची ओळखही पटवता येणार नाही, इतक्या भीषण पद्धतीने मृतदेह जळाले आहेत.  

120

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट एमआयडीसी येथील एसव्हीएस या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला दुपारी अडीच वाजता प्रचंड मोठी आग लागली. या आगीत १८ जण जाळून खाक झाले असून त्यात १६ महिला आणि २ पुरुष आहेत. यात आणखी १५ ते २० मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फायर ब्रिगेडच्या ३ गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही आग पाण्याच्या फवाऱ्याने विझविण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे ही आग आणखी भडकली. याकरता रासायनिक फवाऱ्याचा वापर होणे गरजेचे होते. घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी धाव घेतली.

मृतदेहांची ओळखही पटवता येत नाही!

पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामासाठी येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एसव्हीएस अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे २०-२५ कामगार अडकून पडल्याचे बोलले जात आहे. त्यातील १६ महिला जाळून खाक झाल्या आहेत, अशी माहिती मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे. या मृतदेहांची ओळखही पटवता येणार नाही, इतक्या भीषण पद्धतीने मृतदेह जळाले आहेत.

(हेही वाचा : लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा ‘पाषाण’)

…आणि महिला अडकल्या!

ही कंपनी सॅनिटायझर बनवते. त्याकरता मुळशी येथून महिला कामाला येतात. त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आग लागताच महिला बाहेर पडू शकल्या नाहीत. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार येथे कामासाठी येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एसव्हीएस अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक आग लागली.

आगीची चौकशीचे आदेश! – उपमुख्यमंत्री 

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने  आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आले नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले होते. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिले जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.