कोविन पोर्टलवर नोंदणी करणा-यांसाठी महत्त्वाची सूचना… ८ मेपासून नोंदणीवेळी मिळणार नवा ‘कोड’!

८ मे पासून नोंदणी करणा-या नागरिकांना हा कोड देण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी नागरिक कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. पण काही लोकांनी नोंदणी करुन ठरलेल्या दिवशी लस घेतली नाही, तरी त्यांना लस मिळाल्याची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी आता ८ मेपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करणा-या नागरिकांना एक सिक्युरिटी कोड देण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

नागरिकांचा उडतो गोंधळ

कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी केल्यावर जे नागरिक ठरलेल्या दिवशी लस घेण्यासाठी जात नाहीत, अशा काही नागरिकांना लस दिली गेल्याचा चुकीचा मेसेज देण्यात येत आहे. याबाबत तपासणी केली असता, लसीकरण केंद्रावरील डेटा एंट्री प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे नागरिकांनी लस न घेता त्यांना लस दिली गेल्याचा मेसेज मिळत असल्याने, लोकांचा गोंधळ उडत आहे.

असा मिळेल सिक्युरिटी कोड

ही गैरसोय टाळण्यासाठी आता कोविन पोर्टलवर नोंदणी केल्यावर लाभार्थ्याला एक ४ अंकी सिक्युरिटी कोड देण्यात येईल. हा कोड मोबाईल नंबर, तसेच लसीकरण नोंदणीच्या प्रतीवर देण्यात येईल. लसीकरणावेळी हा कोड नागरिकांना लसीकरण केंद्रावर दाखवणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रावरील डेटा एंट्री प्रणालीत याची नोंद करण्यात येईल आणि मगच नागरिकांना लस देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ८ मे पासून नोंदणी करणा-या नागरिकांना हा कोड देण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

लसीकरणाची पारदर्शकता टिकण्यास मदत

या नवीन प्रणालीमुळे कोविन पोर्टलवर नोंदणी करणा-या नागरिकांची लस घेतल्यानंतरच योग्यप्रकारे नोंद करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी ज्या लसीकरण केंद्रावर आपली नोंदणी केली आहे, त्याच लसीकरण केंद्रावर हा सिक्युरिटी कोड ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच या प्रणालीमुळे लसीकरण मोहिमेचा चुकीचा वापर करणा-यांवर देखील चाप बसेल व या लसीकरण मोहिमेची पारदर्शकता टिकण्यास मदत होईल, असे सांगण्यात येत आहे.

लसीकरणासाठी जाताना…

  • लसीकरणावेळी जाताना नागरिकांनी आपल्या ऑनलाईन नोंदणीची प्रत(डिजिटल/प्रत्यक्ष) सोबत ठेवावी.
  • मोबाईल किंवा कोविन नोंदणीच्या प्रतीवर देण्यात आलेला सिक्युरिटी कोड लसीकरण केंद्रावर दाखवावा.
  • लसीकरण केंद्रावर या कोडची नोंदणी करुन घेणे अत्यावश्यक आहे.
  • लसीकरणासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नागरिकांना एका मेसेजद्वारे लसीकरण झाल्याची माहिती देण्यात येईल.
  • तसेच लसीकरणासाठीचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here